लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील तब्बल ४० हजारांच्या आसपास कृषिपंपांना ‘आॅटो स्विच’ बसविण्यात आलेले असून, यामुळे वीज उपकेंद्रांवर क्षमतेपेक्षा अधिक ताण येत असल्याने रोहित्र जळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. हे ‘आॅटो स्विच’ हटविण्यासंदर्भात महावितरणने मे-जून २०१७ या महिन्यांमध्ये विशेष मोहीम राबविली. मात्र, त्याचा फारसा फायदा झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्ह्यातील सहाही तालुक्यांत महावितरणच्या कृषिपंपधारक ग्राहकांची संख्या ५१ हजार २६८ आहे. त्यापैकी जवळपास ५० हजार शेतकºयांनी शेतांमधील मोटारपंपांना ‘आॅटो स्विच’ बसविले आहेत, त्यापैकी महावितरणला प्रयत्नांती १० हजार आॅटो स्विच हटविण्यात यश मिळाले; परंतु ४० हजार पंपांसंबंधीचा हा प्रश्न अद्याप कायम आहे. तथापि, भारनियमनासह तांत्रिक अडचणींमुळे खंडित होणारा विद्युत पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर मोटारपंपाजवळ न जाताच ‘रिमोट’द्वारे पंप सुरू करता यावा, यासाठी शेतकºयांनी हा प्रकार अवलंबिला आहे. मात्र, केवळ काही क्षणाच्या त्रासापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मोटारपंपांना बसविण्यात आलेले ‘आॅटो स्विच’ अत्यंत धोकादायक ठरत आहेत. सध्या ग्रामीण भागात ठरावीक कालावधीत विजेचे भारनियमन केले जात आहे. यादरम्यान वीज पुरवठा सुरळीत होताच एकाचवेळी सर्व संबंधित शेतकरी रिमोटद्वारे शेतांमधील मोटारपंप सुरू करतात. यामुळे वीज उपकेंद्रांवर अतिरिक्त ताण येण्यासोबतच विजेची गळती मोठ्या प्रमाणात होत आहे. याशिवाय रोहित्र जळण्याचे प्रकारही वाढीस लागले आहेत. शेतांमधील मोटारपंपही नादुरुस्त होत असल्याने संबंधित शेतकºयांनी आपापल्या मोटारपंपाचे ‘आॅटो स्विच’ काढून टाकावे, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात आले आहे.
कृषिपंपधारक शेतकºयांकडे विजेची २७० कोटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकी आहे. ती वसूल होणे कठीण झाले असतानाच सुमारे ४० हजार कृषिपंपांना बसविण्यात आलेले ‘आॅटो स्विच’ हटविण्याचे मोठे आव्हान महावितरणला पेलावे लागत आहे. - पी.के.चव्हाण, कार्यकारी अभियंता, महावितरण, वाशिम