वाशिम : तालुका उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्या कार्यालयातील अभिलेख कक्षात असलेल्या जुन्या अभिलेखांचे शेती व निवासी जमिनी संबंधीचे सर्व प्रकारचे नकाशे नागरिकांना दैनंदिन कामासाठी लागतात. हे जुने अभिलेख शोधून त्यांचे नकाशे देणे हे जिकिरीचे व वेळखाऊ काम आहे. यासाठी नागरिकांना कार्यालयात वारंवार पाठपुरावा करावा लागतो. दिवसेंदिवस अभिलेख जीर्ण होतात. यावर उपाययोजना म्हणून ‘ई-अभिलेख’ कार्यक्रमातून अभिलेख कक्षांचे संगणकीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी अभिलेख ठेवण्यासाठी रँक पुरविले असून तालुका उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील अभिलेखांचे स्कॅनिंग करून ते डिजिटल स्वरुपात साठविले जात आहेत. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या नकाशांची ऑनलाइन पद्धतीने प्रती उपलब्ध होणार आहेत.
जिल्ह्यातील सहाही तालुका उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात जुन्या अभिलेखांचे स्कॅनिंगचे काम सुरू आहे. वाशिम तालुक्यांमध्ये हे काम पूर्ण झाले असून इतर तालुक्यात प्रगतीपथावर आहे. जुन्या अभिलेखांचे स्कॅनिंग करण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीचे स्कॅनिंग यंत्र उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या ठिकाणावरून अभिलेख परिपूर्ण पद्धतीने स्कॅन झाल्यानंतर जिल्हा कार्यालयाकडून ते अद्यावत केले जात आहे. सर्व नकाशांचे स्कॅनिंग करुन डिजिटायझेशन करण्यात येत असून त्यासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या सार्वजनिक उपक्रमाला सदर कामाचे कंत्राट राज्य शासनाने दिले आहे. भूमी अभिलेख विभागाच्या जमीन मोजणी काम मूळ नकाशांचा आधारित करण्यात येते. सर्व प्रकारचे भूमी सर्व्हेक्षण काम सध्या आधुनिक तंत्रज्ञानाने करण्यात येते. तथापि, मूळ नकाशांचे अभिलेख डिजीटल स्वरूपात नसल्याने कर्मचाऱ्यांना संबंधित नकाशा अभिलेख कक्षात शोध डिजीटल करून वापरावा लागतो. याकामात भूमापक यांचा खूप वेळ व श्रम जाते. डिजीटल स्वरूपात नकाशे भूमापकांना उपलब्ध झाल्यावर भूमापक यांना नकाशा अभिलेख क्षणात उपलब्ध होणार असल्याने मोजणी प्रकरण निकाली करण्याचा वेग वाढेल व कामाची गुणवत्तेत सुधारणा होणार आहे. नकाशे डिजीटायझेशन करण्याचा ई अभिलेख हा प्रकल्प भूमी अभिलेख विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच जमीन धारकांना वरदान ठरणार आहे.
१६ प्रकाराचे नकाशे स्कॅनिंगभूमिअभिलेख कार्यालयात असलेले सर्व १६ प्रकारचे नकाशे स्कॅनिंग केले जात आहेत. यात गावानुसार टिपण, काटे फाळणी, फोडी टिपण, फाळणी नकाशा, सविस्तर भूमापन मोजणी नकाशा, सर्व्हे नंबरचे मूळ नकाशे, कापडी सर्व्हे नंबरचे नकाशे, भूसंपादन नकाशे, बंदोबस्त न काशे, सर नकाशे, पोट हिस्सा नकाशा, गट फ्लॉट नकाशा, फेअर स्केच, कोर्ट वाटप नकाशे, गट बुक नकाशे, सिटी सर्व्हे नकाशे, बिनशेती नकाशे, ट्रँग्युलेशन नकाशेचा समावेश आहे.
नकाशांच्या डिजिटायझेशनचे फायदे-मोजणी प्रकरण निकाली करण्याचा वेग वाढेल व कामाची गुणवत्तेत सुधारणा होईल- मूळ नकाशांचे आयुष्य वाढेल- जमीन धारकांना नकाशांची नक्कल तत्परतेने मिळेल.- डिजीटल नकाशे डिजीटल स्वाक्षरीने महसूल विभागाच्या ई महाभूमी या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.-नागरिकांना ऑनलाईन नक्कल शुल्क भरणा करून भूमी अभिलेख कार्यालयात न जाताना संगणकीय प्रती मिळतील.- जमीनीवर अतिक्रमण व मालकीचे वाद कमी करण्यास मदत होईल.- सर्व शासकीय विभागाच्या जमिनीचे भूसंपादनाचे नकाशे डिजीटल होतील- शासकीय जमिनीवर होणारी अतिक्रमणावर प्रभावी उपाय करता येईल.