शिखरचंद बागरेचा । लोकमत न्यूज नेटवर्क / वाशिम : भारताच्या इतिहासात माळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याचा तत्त्वज्ञानी राणी म्हणून त्याकाळी स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या अहल्यादेवी होळकर यांच्या स्मृती आजही वाशिमच्या धनगर गल्लीत जपल्या जात आहेत. वाशिम शहराच्या शुक्रवार पेठ परिसरात परळकर चौकाकडून बाहेती गल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर उजव्या बाजूने मराठा धनगर समाजाची अनेक कुटुंबे वास्तव्याला आहेत. या परिसरातील रहिवासी तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर राहणारे जयराम पाटील यांनी त्या काळात भारताच्या ‘कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट’ अशी उपमा मिळविणाऱ्या अहल्यादेवी होळकर यांचा पुतळा येथील चौकात बसविण्यासाठी सन १९९५-९६ च्या सुमारास स्वत:च्या घरी आणून ठेवला होता. सन १९९७ मध्ये नगर परिषदेचे तत्कालीन बांधकाम सभापती विलास आंबटपुरे यांच्या उपस्थितीत जयराम पाटील यांनी अहल्यादेवी होळकर यांचा पुतळा बसविला. मागील वीस वर्षापासून परिसरातील सर्व रहिवासी अहल्यादेवी होळकर यांची जयंती तसेच पुण्यतिथीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून दैनंदिन नियमितपणे अहल्यादेवी यांचे पुतळ्याचे दर्शन घेतात. परिसरातील महिला भगिनीसुद्धा अहल्यादेवी यांचा गौरवशाली इतिहास आपल्या मुलाबाळांना कथेव्दारे सांगून शिक्षणासोबतच देशभक्तीची जाणीव त्यांना करुन देत आहे. इंग्रजी लेखक लॉरेंस यांनी त्यावेळी अहल्यादेवी होळकर यांची तुलना रशियाची राणी, कॅथेरीन, इंग्लंडची राणी एलिझाबेथ, डेनमार्कची राणी मार्गारेट यांच्याशी केली होती. अहल्यादेवींचे पती खंडेराव होळकर हे बाजीराव पेशव्याचे सरदार होते. त्यांच्याकडे माळवा प्रांताची जहागीरदार म्हणून जबाबदारी होती. पती खंडेराव यांच्या मृत्यूनंतर पुण्यश्लोक अहल्यादेवी यांनी मराठा समाजाचा माळवा प्रांताचा कारभार पाहिला.लढाईत स्वत: सैनाची नेतृत्व करणाऱ्या अहल्यादेवी होळकर या उचित न्यायदानासाठीसुद्धा प्रसिद्ध होत्या. त्यांच्या गौरवशाली इतिहास वाशिम येथे बालकांना सांगितला जातो. त्यांच्या पुतळ्याची नित्यनियमाने पूजा व दर्शन घेऊन ऐतिहासिक स्मृती आजही वाशिम नगरीत जोपासल्या जात आहेत.
अहल्यादेवी होळकरांची स्मृती जपणारी वाशिमची धनगर गल्ली!
By admin | Published: May 18, 2017 1:32 AM