मालेगाव तालुक्यातील पांघरी नवघरे येथील सुदाम तुळशीराम करवते ऊर्फ योगेश मूळ नाव गुलाब नारायण ठाकरे हा या टोळीचा म्होरक्या असून त्याचे साथीदार शंकर बाळू सोळंके, रा. सातमैल वाशिम रोड अकोला, संतोष ऊर्फ गोंडू सीताराम गुडधे रा. आगीखेड ता. पातूर, हरसिंग ओंकार सोळंके रा. चांदूर ता. अकोला या तीन जणांसह जळगाव खानदेश व अकोला येथील प्रत्येकी एक महिला अशा पाच आरोपींना डाबकी रोड, अकोला पोलिसांनी शनिवारी अटक केली. या टोळीने लग्नासाठी मुली असल्याचे सांगत जळगाव खानदेश आणि नंदुरबार येथील उपवर युवकास एक लाख ८० हजार रुपयांनी गंडविले. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील करमुड या गावातील रहिवासी अतुल ज्ञानेश्वर सोनवने पाटील या उपवर युवकास या टोळीने सुंदर मुलींचे फोटो पाठविले व लग्नाचे आमिष दाखविले. या आमिषाला बळी पडत अतुल पाटील यांना एक लाख ५० हजार रुपयांची मागणी केली. मात्र पाटील यांनी २० हजारांची रक्कम देऊन मुलगी दाखविण्याची मागणी केली. मुलगी दाखविल्यानंतर अतुल पाटील यांनी लग्नाची मागणी घातली असता आरोपींनी टाळाटाळ केली. त्यामुळे पाटील यांना फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी डाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर असाच प्रकार पुन्हा नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वडाळी येथील रहिवासी राहुल विजय पाटील (२८) यांच्यासोबतही घडला. फसवणूक झाल्याचे पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनीही डाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या दोन्ही प्रकरणात भादंवि कलम ४२०, ५०४, ३४, ४६५, ४६७, ४६८, ४७१ अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
लग्नासाठी मुली दाखवून फसवणुक करणाऱ्या टोळीच्या म्होरक्यास अकोल्यात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 4:40 AM