लोकमत न्यूज नेटवर्कशिरपुर जैन (वाशिम) - अकोला आगाराची अकोला ते परभणी ही बसफेरी शिरपूर जैन येथील बस स्थानक परिसरात न आणताच गावाबाहेरूनच वळविण्यात येत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. २० वर्षापेक्षा अधिक काळापासून अकोला आगाराची अकोला ते परभणी ही बसफेरी शिरपूर , रिसोड मार्गे सुरू आहे. सदर बसफेरी मागील काही दिवसांपासून शिरपूर बस स्थानकावर आणण्यात येत नाही. परस्पर गावाबाहेरून रिसोडमार्गे परभणीकडे नेण्यात येत आहे. त्यामुळे शिरपूरसह परिसरातील जिंतूर, परभणीकडे जाणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. या प्रवाशांना अकोला ते परभणी बसने प्रवास करणे डोकेदुखी ठरत आहे. अशाप्रकारे जिंतूर ते अकोला बस फेरीसुद्धा काही दिवसापासून गावा बाहेरून वळविण्यात येत आहे. तर ४ डिसेंबर रोजी रिसोड ते अकोला बसफेरी तीन वाजताच्या सुमारास गावाबाहेरूनच नेण्यात आली. अकोला ते रिसोड बसफेरीतून ज्येष्ठ नागरिकांना शिरपूर येथील रिसोड फाट्यावर उतरून देण्यात आले.
मी ४ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता रिसोड येथून रिसोड ते अकोला बसमध्ये शिरपूर पर्यंत प्रवास केला. मात्र वाहक, चालकाने बस शिरपूर बसस्थानकापर्यंत न आणता रिसोड फाट्यावर उतरून दिले. - पंडितराव देशमुख ज्येष्ठ नागरिक शेलगाव बगाडे..
मी माझ्या कुटुंबासह सेनगाव येथे जाण्यासाठी ५ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजतापासून अकोला ते परभणी बसची शिरपूर बस स्थानकावर वाट पाहत होतो. बस शिरपूर बसस्थानकावर आलीच नाही. बस गावावरूनच गेल्याची माहिती काही वेळाने मिळाली. त्यामुळे आम्हाला त्रास सहन करावा लागला.- संदीप तोटेवार, शिरपुर जैन.