दिनेश पठाडे, वाशिम : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड रेल्वे विभागातील रेल्वे रुळाची दुरुस्ती काम करण्याकरिता रोलिंग कॉरिडॉर ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे अकोला-पूर्णा मार्गावरुन धावणारी अकोला-परळी-अकोला पॅसेंजर अंशत: रद्द करण्यात आली आहे.
नांदेड रेल्वे विभागाने ४ ते १० सप्टेंबरपर्यंत विभाग अंतर्गत धावणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द तर काही गाड्या अंशत: रद्द केल्या आहेत. परळी-पूर्णा-अकोला ही गाडी उपरोक्त कालावधीत रद्द करण्यात आली आहे. तर अकोला-पूर्णा मार्गावरुन धावणारी अकोला-परळी वैजनाथ-अकोला (अप-डाऊन) पॅसेंजर अंशत: रद्द करण्यात आली.
गाडी क्रमांक ०७७७४ अकिोला-परळी पॅसेंजर पुढील ९ सप्टेंबरपर्यंत पूर्णा रेल्वेस्थानकापर्यंतच धावणार आहे. ही गाडी पूर्णा-परळी दरम्यान अंशत: रद्द करण्यात आली आहे. तर गाडी क्रमांक ०७६०० परळी -अकोला पॅसेंजर १० सप्टेंबरपर्यंत परळी-परभणी दरम्यान अंशत: रद्द असणार आहे. ही रेल्वे या कालावधीत परभणी ते अकोला दरम्यान धावेल. परळी येथील प्रसिद्ध वैद्यनाथ मंदिर भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. येथे श्रावण महिन्यात दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी असते. अशावेळी वाशिमवरुन थेट परळी गाठणारी पॅसेंजर रेल्वेच अंशत: रद्द करण्यात आल्याने भाविकांना काहीसा अडचणींचा सामना करावा लागणार असून या कालावधीत इतर रेल्वे किंवा एसटीचा आधार घ्यावा लागणार आहे.