वाशिम : सलग दुसऱ्या वर्षीही अक्षय्य तृतीया सणावर कोरोनाचे सावट असल्याने महिलांना माहेरी जाता येणार नाही. माहेरी जाण्याची ओढ आहे; पण कोरोनाचे संकट समोर असल्याने यंदाही सासरलाच माहेर मानून सासरीच अक्षय्य तृतीया साजरी केली जाणार असल्याचा सूर विविध क्षेत्रांतील महिलांमधून उमटला.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीया सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी अनेक महिला माहेरी जाऊन सण साजरा करतात. लग्नानंतर आपले माहेर सोडून एका नवीन परिवारात स्वत:ला सामावून घेण्याचा प्रयत्न महिला नेहमी करतात. सासरलाच माहेर मानून संसाराचा गाडा आनंदाने पुढे येण्याचा पुरेपूर प्रयत्नही करतात. दुसरीकडे माहेरची ओढही कायम असते. वय कितीही होवो, माहेर कुठल्याही स्त्रीसाठी एक सुखद कप्पा असतो. ‘माझं माहेर सावली, उभी दारात माऊली; तिच्या काळजात बाई, माया-ममतेचा झरा’ या ओळीतून माहेरची महती वर्णन करीत अक्षय्य तृतीयेला अनेक महिला माहेरी जाण्याचा बेत आखतात. परंतु, गतवर्षापासून कोरोनामुळे अक्षय्य तृतीयेला माहेरी जाता आले नसल्याची खंत आहे. यंदादेखील कोरोनाचा कहर सुरूच असल्याने माहेरी जाता येणार नाही. माहेरचा ओढ तर आहेच; पण सासरलाच माहेर मानून सासरीच अक्षय्य तृतीया साजरी करण्याचा सूर महिलांमधून उमटला.
००००
लग्नानंतर सासरलाच माहेर मानून सुखाने संसार करीत असताना, माहेरची ओढही कायम राहते. सण, उत्सवानिमित्त माहेरी जाण्याचा योग येत असतो. सलग दुसऱ्या वर्षीदेखील कोरोनाचे संकट असल्याने यंदाही अक्षय्य तृतीयेला माहेरी जाण्याचा योग नाही. सासरीच अक्षय्य तृतीया साजरी केली जाईल.
- शुभदा नायक, जिल्हाध्यक्ष राकाँ, महिला
.....
आम्हा महिलांना सासर, माहेर व कोर्टकचेरीचे कार्यालयीन कामासोबतच घर सांभाळत असताना मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत माहेरी जाण्याची ओढ असते. कोरोनामुळे यंदाही माहेरी जाणे रद्द झाले. कोरोनासारख्या महामारीमुळे इच्छा असूनही माहेरी जाऊ शकत नाही.
- अॅड. श्रुता गडेकर, वाशिम
००००
उन्हाळा आणि अक्षय्य तृतीया सण म्हटलं की महिलांना माहेरी जाण्याची ओढ असते. पण सध्याच्या कोरोना काळात प्रत्येकाने सुरक्षित राहणे आवश्यक आहे. माझे सासर हेच माझे माहेर असे मानून मी सासरीच अक्षय्य तृतीया साजरी करणार आहे.
- भाग्यश्री माधव पाटील, उद्योजक
.......................
कोरोनामुळे दीड वर्षात माहेरी जाण्याचा योग आलाच नाही. त्यामुळे माहेरची किंमत कळली आहे. अक्षय्य तृतीयेलादेखील माहेरी जाणे शक्य नाही. परंतु, तंत्रज्ञानाने माहेरची माणसंही जवळ आणली असून, व्हिडीओ कॉल केला की माहेरच सासरी आणून ठेवल्यासारखे वाटते.
- शिल्पा रितेश कान्हेड, गृहिणी, वाशिम
...........
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव असल्याने माहेरी जाता येत नाही. आरोग्य क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे कोरोना काळात सेवेलाच सर्वाधिक प्राधान्य आहे. अगोदर कर्तव्य आणि त्यानंतरच माहेर. कोरोना काळात सर्वांची सुरक्षाही महत्त्वाची आहे.
- डॉ. सुनीता लाहोरे, आहारतज्ज्ञ, जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम