भर जहाॅंगीर : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना रिसोड अंतर्गत भर जहाॅंगीर येथील अंगणवाडी केंद्रात दिनांक ३ जानेवारी रोजी ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’चा गजर करण्यात आला. स्त्रीभ्रुण हत्या टाळून मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याचे आवाहन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती गीता संजय हरिमकर होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी हरीनारायणसिंह परिहार, बालविकास प्रकल्प अधिकारी रूपाली मोगरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नैना पोहेकर, सरपंच पी. के. चोपडे, अॅड. दत्तात्रय महाजन, केंद्रप्रमुख अनिल गरकळ, रवींद्र आढाव, डॉ. अशिष सिंग, डॉ. बयस, आशा समन्वयक चारूशिला गीते, डॉ. बबेरवाल उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले, मॉ जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी सभापती हरिमकर यांनी मुलीच्या जन्माचा दर खालावत चालला आहे. त्यामुळे स्त्रीभ्रुण हत्या टाळून मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याचे आवाहन केले. नैना पोहेकर यांनी मुलगा-मुलगी समान मानून मुलींना कधीही कमी लेखू नका, असे सांगितले. गटविकास अधिकारी परिहार यांनी प्रत्येक मातेने आपल्या मुलीला एक मैत्रिण म्हणून सांभाळणे आवश्यक आहे, असे सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी जिजाऊ, सावित्रींच्या वेशभूषा केल्या होत्या. ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’, स्त्रीभ्रुण हत्या रोखण्याचा संदेश यावेळी रांगोळीच्या माध्यमातून देण्यात आला. यातून मान्यवरांनी प्रथम, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यांची निवड करून त्यांचा सत्कार केला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक उषा हाडे यांनी केले. सूत्रसंचालन संदीप देशमुख यांनी केले तर प्रतिभा घवळे यांनी आभार मानले.
भर जहाॅंगीर येथे ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’चा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 6:09 AM