शेलूबाजार येथून जवळच असलेल्या नांदखेडा येथे शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय मुस्लीम बांधवांकडून घेण्यात आला. त्यानुसार, ग्रामपंचायत सदस्य शे. अकील यांच्या नेतृत्वात मुस्लीम युवक व सर्वधर्मसमभाव मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. एवढ्यावरच ही युवा मंडळी थांबली नाही तर गावातील विधवा व गरजू महिलांना शिवजयंतीनिमित्त भेट म्हणून ५१ साड्यांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बुद्धरत्न इंगोले यांनी केले. प्रास्ताविक पांडुरंग जायभाये यांनी केले. गजानन जायभाये यांनी आभार मानले. शिवजयंती सोहळ्यास गाव परिसरातील सर्वधर्मीय समाजबांधवांनी उत्स्फूर्त हजेरी लावली.
..............
बॉक्स :
कोरोनाविषयक सूचनांचे पालन
नांदखेडा येथे शिवजयंती उत्सवात सहभागी सर्वधर्मीय समाजबांधवांनी कोरोनाविषयक सूचनांचे तंतोतंत पालन केले. यावेळी उपस्थित सर्वांनी तोंडाला मास्क परिधान केल्याचे दिसून आले. विशेषत: कुठलाही धोका न पत्करता सुरक्षित राहण्यासाठी गावकऱ्यांनी सामाजिक, शारीरिक अंतर पाळावे, हात वारंवार स्वच्छ धुवावेत यासह इतर महत्त्वपूर्ण बाबींबाबत जनजागृती करण्यात आली.
...................
कोट :
छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीयांना वंदनीय आहेत. त्यांच्या मावळ्यांमध्ये मुस्लीम बांधवांनाही महत्त्वाचे स्थान मिळाले होते. अशा या महापुरुषाची जयंती साजरी करण्याचे सौभाग्य मिळाले, ही आमच्यासाठी मोठी बाब आहे.
- शे. अकील
ग्रामपंचायत सदस्य, नांदखेडा