काेराेनाचा परिणाम, : श्रावण महिन्यातही धार्मिक कार्यक्रमाला ब्रेक
मालेगाव : भारतीय संस्कृतीत श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पावसाळ्याच्या ऋतूत येणाऱ्या या महिन्यात जिवती अमावस्यापासून पोळा सणापर्यंत विविध सणांची रेलचेल असते. मंदिरात भजन, कीर्तन, अभिषेक, मंत्रोपचाराचा जयघोष सुरू होतो. परंतु मागील दीड वर्षापासून कोरोनाने थैमान घातल्याने ही परंपरा खंडित झाली आहे. श्रावण महिन्यात गावागावात कीर्तन, प्रवचन, हरिपाठ या धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. परंतु गावोगावी निनादणारा भजन, कीर्तनाचा व टाळ-मृदंगाचा गजर हरपल्याचे दिसून येत आहे.
वारकरी संप्रदायाची भगवी पताका घेऊन अखंड हरिनाम अनेक वर्षांची परंपरा मागील दीड वर्षापासून कोरोनाच्या महामारीत लुप्त झाली आहे. कीर्तनकार पखवाजवादक, वीणकरी, टाळकरी, भजनकरी श्रावण महिन्यातही मंदिराची दारे बंद असल्यामुळे सर्वच धार्मिक कार्यक्रमांवर बंदी असल्याने सर्वच व्यवसाय ठप्प असल्याने या भाविकांनाही घरीच बसण्याची वेळ आली आहे. मागील वर्षीही श्रावण महिन्यात मंदिराचे द्वार बंद असल्याने भाविकही दुरूनच नमस्कार करीत आहेत. शिवाय गर्दी टाळून काही भाविक पुजापाठ करीत आहेत. मंदिरातही श्रावणमासानिमित्ताने गर्दी टाळून कार्यक्रम होत असले तरी पूर्वीसारखे भाविकही आता मंदिर बंद असल्याने पुजापाठ करण्यासाठी दिसत नाही. त्यामुळे भजन, कीर्तनाचा व टाळ-मृदंगाचा गजर हरपल्याचे चित्र दिसायला लागले आहे.
..................
हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात अनेक धार्मिक कार्यक्रम होत असतात; परंतु यावर्षी कोरोनामुळे सर्व बंद आहे. शासनाने धार्मिक कार्यक्रम करण्याची बंदी उठवली पाहिजे.
ज्ञानेश्वर वाढणकर,
वारकरी संप्रदाय, मालेगाव