मानोरा- शेतकरी प्रशिक्षण केंद्राच्या बांधकामात गैरप्रकार झाल्याची तक्रार करण्यात आली असून याची चाैकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तालुक्यातील अभावग्रस्त शेतकऱ्यांचे मनोबल वाढावे, शेतकऱ्यांच्या मनामध्ये निराशेच्या भावनेचा शिरकाव होऊ नये या उदात्त हेतूने राज्याच्या तत्कालीन वनमंत्र्यांनी पुढाकार घेऊन आणि हालचाली करून वन विभागाची जागा तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या प्रशिक्षण केंद्राच्या भिल डोंगर फाट्यावरील नियोजित वास्तूसाठी उपलब्ध करून दिली होती.
तालुक्यातील महत्त्वकांक्षी शेतकरी प्रशिक्षण केंद्रासाठी उभारण्यात येणाऱ्या या इमारतीचे भूमिपूजन दिवंगत संत डॉ. रामराव महाराज यांनी तत्कालीन वनमंत्र्यांच्या उपस्थित केले होते.
अवर्षण, अतिवर्षण, कीटाणूंची टोळधाड, वन्यप्राण्यांचा हैदोस या नैसर्गिक व इतरही मानवीय कारणांमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांवर पिके घेताना मोठ्या अडचणींचा सामना येत असल्याने मानसिक दबाव येऊन आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय बळीराजा घेत असल्याचे लक्षात घेऊन हिवरा बु. ता. मानोराच्या हद्दीतील शेंदुर्जना- धानोरा मार्गावर वनविभागाच्या हद्दीत निसर्गरम्य ठिकाणी शेतकरी प्रशिक्षण केंद्र बांधण्यासाठी शासनाकडून वन विभागाची जमीन व मोठ्या प्रमाणात रकमेची तरतूद करण्यात आली आहे.* शेतकरी प्रशिक्षण केंद्राची वास्तू जवळपास ८० टक्केपर्यंत पूर्ण होत आलेली असून शासनाने ठरवून दिलेल्या मानक आणि निकषानुसार शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे बांधकाम न करता अतिशय निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य कंत्राटदार वापरत असल्याची लेखी तक्रार हिवरा बु.चे सरपंच अनिल चव्हाण यांनी शासन आणि प्रशासनाकडे केली आहे.* बांधण्यात आलेल्या वास्तूची गुण नियंत्रक विभागाकडून चौकशी केल्याखेरीज कुठल्याही प्रकारचे बिल संबंधित कंत्राटदारांना अदा करण्यात येऊ नये असेही लेखी निवेदनाद्वारे मागणी सरपंच चव्हाण केली आहे.*
बांधकामात दरम्यान रेती उपलब्ध नसल्याने क्रस्टयाडचा उपयोग कंत्राटदाराने केला आहे. राहिलेल्या प्लास्टरसाठी वाळूचा उपयोग करण्यात येणार आहे.
श्री.मा.पवार
प्रभारी शाखा अभियंता सा. बां. विभाग, मानोरा