वाशिम: जिल्हा परिषद विषय समितीच्या सभापतींचे खाते वाटप करण्यासाठी २१ जुलै रोजी सभा असून, मतदानाअंती खाते निश्चिती होणार आहे. मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर २0१३ मध्ये झाली होती. या निवडणुकीत १७ जागा घेऊन काँग्रेस हा पक्ष जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. राष्ट्रवादी काँग्रेस आठ, शिवसेना १0, भाजपा व अपक्ष प्रत्येकी सहा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक व भारिप-बमसं तीन असे पक्षीय बलाबल आहे. अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्याने २९ जून रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होऊन काँग्रेस-राकाँची सत्ता कायम राहिली. अध्यक्षपदी काँग्रेसच्या हर्षदा दिलीप देशमुख तर उपाध्यक्षपदी राकाँचे चंद्रकांत ठाकरे यांची वर्णी लागली. त्यानंतर चार विषय समिती सभापती पदासाठी ८ जुलै रोजी निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेस-राकाँमधील नाराज सदस्यांना आपल्या बाजूने वळविण्यात भाजपा-सेना युतीला यश आल्याने काँग्रेसला एक विषय समिती गमवावी लागली. सुधीर गोळे (काँग्रेस), पानुताई जाधव (राकाँ), यमुना जाधव (काँग्रेस) व विश्वनाथ सानप (शिवसेना) अशा चार सदस्यांची सभापती पदी वर्णी लागली. आता उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, सभापती सुधीर गोळे व विश्वनाथ यांना खाते वाटप करण्यासाठी २१ जुलै रोजी सभा होणार आहे. चंद्रकांत ठाकरे हे अर्थ व बांधकाम समिती कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत तर शिक्षण व आरोग्य समिती पटकविण्यासाठी विश्वनाथ सानप आणि सुधीर गोळे यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. शेतकरी व पशुपालकांशी निगडित असलेल्या कृषी व पशुसंवर्धन विषय समितीला पसंती देण्याला कुणी फारसे उत्सुक नसल्याची चर्चा आहे. ह्यक्रीमह्ण समिती मिळविण्यासाठी अर्थपूर्ण वाटाघाटी सुरू असल्याने ८ जुलैच्या चमत्काराची पुनरावृत्ती झाल्यास नवल वाटायला नको.
उद्या विषय समिती सभापतींचे खाते वाटप
By admin | Published: July 20, 2016 2:05 AM