रिसोड (वाशिम) : चालू वर्षातील फेब्रुवारी महिन्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे तालुक्यातील १६ हजार ५०८ शेतकरी बाधीत झाले होते. दरम्यान, महसूल विभागाच्या सर्वेक्षणानुसार शासनाकडून संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ९ कोटी ९१ लाख ७६ हजार ८०६ रुपयांचे अनुदान मंजूर झाले. त्यापैकी आतापर्यंत ११ हजार ४८८ शेतकऱ्यांना ७ कोटी ४९ लाख ९८ हजार २७४ रुपयांची मदत वितरित झाल्याची माहिती प्रशासनाकडून कळविण्यात आली.
वादळी वारा, अवकाळी पाऊस आणि तुफान स्वरूपातील गारपीटीमुळे रिसोड तालुक्यातील हरभरा, गहू आणि हळद उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दरम्यान, तहसीलदार राजेश सुरडकर, तालुका कृषी अधिकारी आर.एच.तांबिले यांच्यासह तलाठी, मंडळ कृषी अधिकाºयांनी तडकाफडकीने नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण करून तसा अहवाल जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे सादर केला. शासनानेही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पात्र शेतकऱ्यांना तडकाफडकी मदत मंजूर केली. दरम्यान, शासनाकडून १६ हजार ५०८ शेतकऱ्यांसाठी प्राप्त ९ कोटी ९१ लाख ७६ हजार ८०६ रुपये मदतीपैकी ११ हजार ४८८ शेतकऱ्यांना आतापर्यंत मदत वितरित करण्यात आली असून उर्वरित ५०२० शेतकऱ्यांनाही लवकरच मदतीचे वितरण केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. ही बाब लक्षात घेवून शासनाने विनाविलंब मदत मंजूर केली. प्रशासनानेही ही मदत शेतकºयांना वितरित करण्यात कुठलीच दिरंगाई केलेली नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकºयांची सोय झाली.
- लखनसिंग ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष, भाजपा