शिरपूर येथील बालाजी गोविंदा कदम (वय ५०) यांना १० ऑगस्ट रोजी आजारी असल्याने वाशिम येथील सिक्युरा हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी त्यांना कोरोना असल्याचे निदान केले व दवाखान्यामध्ये भरती करून घेतले. त्यांचे उपचाराचे बिल १ लाख ५८ हजार इतके आकारण्यात आले, तर औषधांचे बिल ९७ हजार ४६० असे एकूण २ लाख ५५ हजार ४६० असे विक्रमी बिल वसूल करण्यात आले. गरीबीची परिस्थिती असलेल्या कदम कुटुंबीयांना व्याजाने पैसे काढून बिल द्यावे लागले. कोरोना रुग्णाची सिक्युरा हॉस्पिटलमध्ये लूट झाल्याचे प्रकरण यापूर्वीच सिद्ध झाले आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने फसवणूक झालेल्या काही रुग्णांचे अधिक आकारलेले बिल परतसुद्धा करण्यात आले. मात्र, शिरपूर येथील गरीब कदम कुटुंबाचे अधिकचे बिल अद्याप परत करण्यात आले नाही. त्यामुळे कदम कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहे. जादा घेतलेले बिल तत्काळ परत द्या किंवा मुंबई येथील मातोश्री भवनासमोर आत्मदहनाची परवानगी द्या, अशी मागणी कदम कुटुंबाच्या वतीने राजेश गोविंदा कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ८ फेब्रुवारी रोजी केली आहे.
मातोश्रीसमोर आत्मदहनाची परवानगी द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 4:40 AM