वाशिम : जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून येत असताना, इंजेक्शन व औषधीचा तुटवडा जाणवत आहे. अकोला, नागपूर येथून औषधी, इंजेक्शन आणावे लागत असून, निर्धारित किमतीपेक्षा जादा पैसे मोजावे लागत असल्याने रुग्णांसह नातेवाईकही हतबल होत असल्याचे दिसून येते.
कोरोनावर मात केल्यानंतरही बुरशीमुळे होणारा आजार अर्थात म्युकरमायकोसिसचे रुग्ण जिल्ह्यात आढळून येत आहेत. ११ मे रोजी एका ६२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागही अलर्ट झाला आहे. मुख, दात, डोळे आणि मेंदूवर आघात करणाऱ्या या आजारावर वेळीच उपचार न मिळाल्यास जीवावरही बेतू शकते. या आजाराची लक्षणे दिसून आल्यानंतर कान, नाक व घसातज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ, दंततज्ज्ञांकडे रुग्ण उपचारासाठी येत आहेत. पूर्वीच्या तुलनेत आता सर्वत्रच म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून येत असल्याने इंजेक्शन व औषधीचा तुटवडा जाणवत आहे. जिल्ह्यात इंजेक्शन व औषधी उपलब्ध नसल्याने नातेवाइकांना अकोला, नागपूर येथून इंजेक्शन, औषधी आणण्याची वेळ आली आहे. काही इंजेक्शन तर वेटिंगवर असल्याने उपचारासही विलंब होत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
००००००
जिल्ह्यातील म्युकरमायकोसिसचे संशयित रुग्ण ३६
इंजेक्शन लागायचे वर्षाला २
इंजेक्शनची सध्या दररोज मागणी १० (३० व्हायल)
०००००
इंजेक्शन, औषधी मिळेना
म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण जिल्ह्यात आढळून येत असल्याने विविध प्रकारचे इंजेक्शन तसेच औषधीची मागणी अचानक वाढली आहे. राज्यात सर्वत्रच रुग्ण आढळून येत असल्याने लिपोसोमल एम्फोटिसिरीन बी इंजेक्शन, पोसोकोनाझोल टॅब्लेट यासह अन्य औषधींचा जिल्ह्यात प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे.
लिपोसोमल एम्फोटिसिरीन बी इंजेक्शन जिल्ह्यात उपलब्ध नसल्याने अकोला, नागपूर येथून आणण्याची वेळ आली आहे. इंजेक्शन व औषधीचा तुटवडा असल्याने जिल्ह्यातील बरेच रुग्ण हे अकोला, नागपूर व अन्य ठिकाणी उपचारासाठी जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
जिल्ह्यात इंजेक्शन व औषधी उपलब्ध झाली तर रुग्णांवर जिल्ह्यातच उपचार करणे सुलभ होईल. यासाठी जिल्हा प्रशासन, पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, असा सूर रुग्ण, नातेवाइकांमधून उमटत आहे.
००००
३० व्हायल हव्या, मिळतात दोन ते सहा
कोरोनापूर्वी जिल्ह्यात एक, दोन इंजेक्शनची गरज पडत होती. आता लिपोसोमल एम्फोटिसिरीन बी या इंजेक्शनच्या दररोज २० ते ३० व्हायल उपलब्ध असावे, असे डॉक्टरांना अपेक्षित आहे. मात्र, दोन ते सहा व्हायल मिळत असल्याने अनेक रुग्ण हे उपचारासाठी परजिल्ह्यात जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यातच उपचार होण्यासाठी इंजेक्शन व औषधी जिल्ह्यातच मिळणे अपेक्षित आहे.
०००००००
नाक, डोळा, दात, जबड्याला फटका
ही बुरशी सर्वप्रथम नाका-तोंडातून शरीरात प्रवेश करते. नाकाला व घशात सूज येऊन वेदना जाणवू लागतात. हिरड्यांवर सूज, पक्के दात अचानक पडणे, गाल बधीर वाटणे तसेच डोळ्यांच्या स्नायूंवर सूज येऊन, डोळ्यांची हालचाल कमी होते. ऑप्टिक नर्व्हला (दिसण्यासाठी मेंदूला जोडणारी नस) जंतुसंसर्ग झाला, तर कायमचे अंधत्व येऊ शकते. पुढे हा संसर्ग डोळ्यांतून मेंदूकडे पसरतो व जीवाला धोका होऊ शकतो.
......
एका रुग्णाला लागतात ४५ डोस
एका रुग्णाला दररोज तीन डोस याप्रमाणे दोन आठवड्यांपर्यंत इंजेक्शन, गोळ्या घ्याव्या लागतात. यासाठी किमान दीड लाख ते दोन लाखांपर्यंत खर्च येऊ शकताे. वाशिम जिल्ह्यात तुटवडा असल्याने काही जण अकोला व नागपूर येथून इंजेक्शन व औषधी मागवितात. काही ठिकाणी एमआरपीपेक्षा थोडी अधिक किंमत आकारली जात असल्याचे तर काही ठिकाणी एमआरपीमध्ये इंजेक्शन, औषधी मिळत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
००००००
तज्ज्ञ काय म्हणतात...
वेळीच सल्ला घ्यावा...
म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण आढळून येत असून, दररोज किमान एक रुग्ण तपासणीसाठी येतो. कान, नाक, घसा याबाबत काही आजार उद्भवला तर वेळ न दवडता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. संतोष बेदरकर
कान, नाक, घसातज्ज्ञ, वाशिम
०००००००
वेळीच निदान आवश्यक
आठवड्यातून किमान दोन रुग्ण येत असून, वेळीच निदान व उपचार मिळाले तर रुग्ण पूर्णपणे बरा होतो. डोळ्याशी संंबंधित काही आजार उद्भवला तर अंगावर दुखणे न काढता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. स्वीटी गोटे,
नेत्ररोग तज्ज्ञ, वाशिम
००००००
घाबरून जाऊ नका, उपचार घ्या !
पोस्ट कोविडनंतर तोंडाच्या एका बाजूला सूज येणे, दातातून पस येणे, अचानक दात हलणे, अशी लक्षणे आढळून आली तर रुग्णांनी घाबरून न जाता लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा. वेळीच उपचार मिळाले तर रुग्ण हा पूर्णपणे बरा होऊ शकतो.
- डॉ. मंजुषा वराडे, दंतरोग तज्ज्ञ,
जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम
०००००००००००००००