लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात चार राष्ट्रीय महामार्गाची कामे सद्या सुरू आहेत. त्यासाठी एक बाजू तयार करणे सुरू आहे; तर दुसरी बाजू खोदून ठेवण्यात आलेली आहे. यामुळे तसेच तयार करण्यात आलेले पर्यायी रस्ते पूर्णत: कुचकामी ठरल्याने वाहनधारकांची गोची होत आहे.वाशिम जिल्ह्यात शासनाकडून कारंजा-वाशिम, मंगरूळपीर तालुक्यातून जाणारा महान-आर्णी, कारंजा-मानोरा, मालेगाव व वाशिमवरून जाणारा अकोला ते वारंगा आणि मालेगाव-रिसोड अशा पाच राष्ट्रीय महामार्गांच्या नुतनीकरणास मंजूरी मिळालेली आहे. त्यानुसार, सिमेंट-काँक्रीटीकरणाच्या महामार्ग चौपदरीकरणाची ही कामे गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. त्यासाठी पाचही मार्गांवरील रस्ते खोदून ठेवण्यात आले असून रस्त्याची एक बाजू पूर्ण करित असताना दुसऱ्या बाजूने असलेल्या कच्च्या रस्त्यावरून वाहतूक सुरू आहे. काहीठिकाणी पुलांची कामे सुरू असल्याने पर्यायी रस्त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे; मात्र तकलादू स्वरूपातील या पर्यायी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल साचत आहे. याशिवाय निर्माणाधिन महामार्गाची एक बाजू कच्चा स्वरूपात ठेवल्याने त्यालाही ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. परिणामी, वाहनधारकांची त्रेधातिरपीट उडत आहे. या बिकट समस्येकडे संबंधित यंत्रणेने लक्ष पुरवून वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी रस्त्यांची डागडूजी करून कामास गती द्यावी, अशी मागणी सर्वच स्तरातून जोर धरत आहे.
पाऊस झाल्यास वाहतूक होतेय ठप्प!निर्माणाधिन महामार्गाच्या एका बाजूचे कामे सुरू असून पाऊस झाल्यास दुसरीकडच्या कच्चा रस्त्यावर चिखल साचत आहे. यामुळे दुचाकी वाहने, प्रवासी आॅटो या रस्त्यांवरून धावणे मुश्कील होत आहे. चिखलामुळे अनेकवेळा या मार्गांवरील वाहतूक ठप्प होत असल्याचे दिसून येत आहे.राष्ट्रीय महामार्गाची कामे करित असताना वाहतूकीलाही अडथळा जाणवू नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पुलानजिकच्या पर्यायी रस्त्यांची तथा दुसºया बाजूच्या कच्चा रस्त्यांची डागडूजी करण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदारांना दिल्या जातील.- एस.एम. फुलसुले,उपअभियंता, राष्ट्रीयमहामार्ग प्राधिकरण