लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य कें द्रातील रुग्णवाहिकेवर कार्यरत कंत्राटी चालकांचे वेतन गेल्या तीन महिन्यांपासून थकले आहे. आधीच वेतन तुटपुंजे असताना ते वेळेवर मिळत नसल्याने या चालकांच्या कुटूंबाची उपासमार होत आहे. वाशिम जिल्ह्यात एकूण २५ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि १५३ आरोग्य उपकेंद्र आहेत. या आरोग्य केंद्रांत विविध संवर्गातील हजारो कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्व आरोग्य केंद्रांचे नियंत्रण आणि सोयीसुविधांची जबाबदारी जिल्हा परिषदेची आहे. प्राथमिक स्वरुपात पंचायत समित्यामधील आरोग्य विभागाचे या आरोग्य केंद्रांवर नियंत्रण आहे. तथापि, जिल्ह्यातील बहुतांश आरोग्य केंद्र विविध समस्यांच्या कचाट्यात सापडले आहेत. अधिकारी, कर्मचाºयांची रिक्त पदे, इमारतीची दुरावस्था, तर कधी औषधींचा तुटवडा आदि समस्या आरोग्य केंद्रांत पाहायला मिळतात. या आरोग्य केंद्रात कार्यरत कर्मचाºयांनाही त्याचा त्रास सहन करावा लागतो. आता हा त्रास सहन करतानाच वेतनास होणाºया विलंबाचीही त्यात भर पडत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेवर चालक म्हणून कार्यरत १२ कंत्राटी कर्मचाºयांना थकीत वेतनामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांचे वेतन थकले आहे. रात्री, अपरात्री गंभीर रुग्णाला तातडीने जिल्ह्याच्या ठिकाणी हलविण्याची जबाबदारी त्यांना पार पाडावी लागते. ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत असतानाही वेतन थकल्यामुळे त्यांच्या कुटुंबियावर उपासमारीची पाळी आली आहे. वरिष्ठ अधिकाºयांनी याची दखल घेऊन वेतन तातडीने अदा करावे, अशी मागणी हे चालक करीत आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेवर कार्यरत असलेल्या चालकांची पदे रुग्ण कल्याण समितीमार्फत भरण्यात येतात. तालुका वैद्यकीय अधिकाºयांकडून दर महिन्याच्या पहिल्याच तारखेला त्यांचे वेतन अदा करण्यात येते. सर्व चालक कर्मचाºयांचे वेतन नियमित अदा करण्यात येत असून, कोणाचे वेतन थकले असल्याची माहिती आपल्याला मिळाली नाही. ज्या चालकाचे वेतन थकले असेल, त्यांनी थेट आपल्याशी संपर्क साधून माहिती द्यावी. -डॉ. अविनाश अहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी , वाशिम