मानोरा : सन २०१५ मधील खरीप हंगामात अपुऱ्या पावसामुळे सर्व प्रकारच्या पिकाचे नुकसान झाले. त्याची भरपाई म्हणून तहसीलदारांमार्फत पीकविम्याचा मदत निधी तहसीलदारांमार्फत शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आला. मात्र तो विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँकेच्या शाखा व्यवस्थापकांनी परस्पर कर्जखात्यात जमा केला. यासंबंधी प्राप्त तक्रारीवरून तहसीलदारांनी पोलीस विभागामार्फत संंबंधित शाखा व्यवस्थापकास बुधवार, २६ एप्रिल रोजी कारणे दाखवा नोटिस बजावली आहे.याप्रकरणी लिलाबाई विठ्ठलराव गावंडे या महिला शेतकऱ्याने तक्रार दाखल केली होती. त्याची दखल घेत तहसीलदार एफ. आर.शेख यांनी बजावलेल्या नोटिसमध्ये नमूद केले आहे की, शासन निर्णयानुसार संबंधित खातेदारांच्या बंँक खात्यात थेट जमा करण्याचे व कोणत्याही परिस्थितीत रोखीने रक्कम अदा न करण्याचे आदेश होते. तसेच मदतीची रक्कम बाधित खातेदाराच्या खात्यात थेट जमा करताना मदतीच्या रकमेतून कोणत्याही प्रकारची शासकीय थकबाकी वसूल करू नये, अशा स्पष्ट सूचना होत्या. असे असताना लिलाबाई विठ्ठलराव गावंडे यांना शासनाने दिलेली मदतीची रक्कम कर्ज खात्यात जमा करण्यात आली. याबाबत आपणास भ्रमणध्वनीवरुन विचारले असता रिजनल आॅफीसच्या आदेशानुसार सदर रक्कम एनपीए खातेदारांच्या खात्यातून कपात केल्याचे सांगितले व मला आपले निर्देश बंधनकारक नसून मी रिजनल आॅफिसच्या आदेशाचे पालन केले, असे उद्धट उत्तर दिले. मुळातच सदर रक्कमेतून कोणत्याही प्रकारची कपात न करण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश असल्याने आपण शासनाच्या नियमाचे उल्लंघन केल्याचे नमूद करून याप्रकरणी कारणे दाखवा नोटिस बजावली.रिजनल आॅफिसच्या निर्देशानुसार पीकविमा रक्कम कर्जखात्यात जमा केली. मात्र, वरिष्ठांच्या आदेशाने ती परत शेतकरी लाभार्थीच्या खात्यात जमा केली जाणार आहे.- विलास चेटुले, व्यवस्थापक, विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँक, शाखा मानोरा
पीक विम्याची रक्कम जमा केली कर्ज खात्यात!
By admin | Published: April 27, 2017 1:03 AM