वाशिम : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी बँकमधून काढलेल्या कर्ज कपातीची रक्कम वाशिम पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी यांच्या खात्यामध्ये गेल्या दहा दिवसापासून पडून आहे. यामुळे कर्जदार शिक्षकांना व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागत असल्याने आस्थापनावर काम करणाऱ्या कामचुकार कर्मचाऱ्यावर कार्यवाही करण्याची मागणी पतसंस्थेचे अध्यक्ष विलासराव गोटे व कास्ट्राईब शिक्षक संघटनेने केली आहे. वाशिम जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पत संस्थेमधून अनेक शिक्षकांनी कर्ज दिलेले आहे. कर्ज देण्यात आलेल्या शिक्षकांच्या वेतनामधून कपात केल्या जाते. मार्च २०१७ चे वेतन सीएमपी मार्फत ६ मे रोजी झाले असून त्या वेतनातील सर्व कपातीच्या रक्कमा गटशिक्षणाधिकारी यांचे खात्यात जमा झालेल्या आहेत. परंतू वाशिम जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पत संस्था यांचेकडून कर्मचाऱ्यांनी कर्ज घेतलेले असल्यामुळे त्या कर्ज कपातीच्या हप्त्याची रक्कम १६ मे पर्यंत पत संस्थेमध्ये जमा झाली नाही. या कारणामुळे शिक्षकांच्या कर्जाच्या रकमेवर ज्यादा व्याज लागणार आहे. त्याची रक्कम संबंधीत आस्थापनावर काम करणाऱ्या लिपिकाकडून वसूल करण्यात यावी तसेच दोषी कर्मचाऱ्या विरूध्द योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी होत आहे.
कर्ज कपातीच्या हप्त्याची रक्कम "बीडीओं"च्या खात्यात पडून!
By admin | Published: May 16, 2017 8:01 PM