कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत विशेषत: ‘लंग्ज इन्फेक्शन’, श्वास घ्यायला त्रास जाणवणे, चालताना अथवा बोलताना धाप लागणे यासारखे त्रास बळावले आहेत. कपालभाती, भस्त्रीका, अनुलोम-विलोम केल्याने हे त्रास बहुतांशी कमी होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विशेष बाब म्हणजे जे लोक सातत्याने प्राणायाम करतात, त्यांच्यापैकी अनेकांना कोरोनाची बाधा झाली नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून बहुतांश लोकांनी सकाळच्या सुमारास प्राणायाम करण्याकडे लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे.
.....................
नियमित प्राणायाम केल्याचे फायदे
१) उज्जायी प्राणायाममुळे डोक्यातील उष्णता कमी होते. दमा, क्षय व फुप्फुसाचे रोग बरे होतात. नित्य सरावाने जठराग्नी प्रदीप्त होत असल्याने पचनक्रिया, श्वसनक्रिया आणि ज्ञानक्रिया कार्यक्षम बनते.
२) सित्कारी या प्राणायामच्या सरावाने डोळे व कान यांना थंडावा येतो, यकृत कार्यान्वित झाल्याने पचनक्रिया सुधारते. शारीरिक शक्ती व मनोबल वाढते. छातीत जळजळ होणे व पित्तासारखे दोष नष्ट होतात.
३) भस्त्रीका केल्याने कफ नाहीसा होतो. नाक व छातीत होणारा त्रास बरा होतो. तसेच दम व क्षय यासारखे आजार बरे होतात. या प्राणायाममुळे कफ, पित्त व वायूने होणारा त्रास नाहीसा होतो.
.......................
प्राणायाम तज्ज्ञ म्हणतात...
योगासन, प्राणायाम केल्याने शरीरातील बहुतांश आजार नाहीसे होतात. कोरोना विषाणू संसर्गातही ‘प्राणायाम’ची मात्रा फायदेशीर ठरलेली आहे. स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी दिवसभरातून कधीही; मात्र उपाशीपोटी प्राणायामचा नियमित सराव आवश्यक आहे.
- भगवंतराव वानखेडे
...............
प्राणायामच्या नित्य सरावामुळे फुफ्फुस निरोगी राहण्यासह ‘एच.बी.’ आणि ‘ऑक्सिजन लेव्हल’ नियंत्रणात राहते. त्याचा सकारात्मक परिणाम होऊन रोगप्रतिकारशक्ती कायम टिकण्यास मदत मिळून कोरोनाचा धोका टाळता येणे शक्य आहे.
- मंजुश्री जांभरूणकर
..............
नियमित योगा करणारे म्हणतात...
योगासनांसोबतच नियमितपणे प्राणायामचा सराव करीत राहिल्याने मला कुठल्याही प्रकारचा आजार अद्याप जडलेला नाही. तज्ज्ञ मार्गदर्शक भगवंतराव वानखेडे हे नि:शुल्क योगासनांचे धडे देतात. त्यामुळे या बाबीवर कुठलाही खर्चदेखील करावा लागत नाही.
- सुखदेव राजगुरू
...............
कोरोना विषाणू संसर्गाने सर्वत्र हाहाकार माजविला आहे. विशेषत: श्वास घेण्यास त्रास होणे, दम लागणे यासारख्या त्रासांमुळे जनजीवन हैराण झाले आहे. नियमित प्राणायामचा सराव करीत राहिल्याने मला मात्र आतापर्यंत तरी कुठलाही त्रास जाणवला नाही.
- शंकरराव उजळे