संतोष वानखडे
वाशिम : मूत्रपिंडाचा (किडनी) आजार असलेल्या रुग्णाला ‘डायलिसिस’ मशिनद्वारे उपचाराची गरज असून, जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराची मोफत सुविधा उपलब्ध आहे. महिन्याला सरासरी २२५ रुग्णांचे डायलिसिस करण्यात येते. अलिकडच्या काळात मूत्रपिंडाशी संबंधित आजाराचे प्रमाण वाढत आहे. मूत्रपिंडाच्या आजारासाठी सुरूवातीच्या टप्प्यात गोळ्या, औषधी, रक्तदाब नियंत्रणात ठेवणे, हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविणे, वजन नियंत्रणात ठेवणे आदी उपचारपद्धतीवर भर दिला जातो. जिल्हा सामान्य रुग्णालयात वातानुकूलित सुसज्ज १० बेडच्या डायलिसिसची व्यवस्था आहे. येथे एकूण १४ डायलिसिस मशीन आहेत. तज्ज्ञ डाॅक्टर व कर्मचारीदेखील उपलब्ध ठेवण्यात आले.
रुग्णाची प्रकृती जास्त बिघडल्यास डायलिसिसचा टप्पा सुरू केला जातो. रक्ताचे डायलिसिस आणि पोटाचे डायलिसिस असे डायलिसिसचे दोन प्रकार आहेत. डायलिसिसची गरज असणाऱ्या रुग्णांना तातडीने वैद्यकीय सेवा देण्याच्या सूचना जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. अनिल कावरखे यांनी संबंधितांना दिल्या आहेत. दर आठवड्याला संबंधित डाॅक्टर व कर्मचाऱ्यांकडून ते आढावादेखील घेतात. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात डायलिसिस करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील वाढली आहे. महिन्यात सरासरी २२५ रुग्णांचे मोफत डायलिसिस करण्यात येत असून, जानेवारी ते मार्च अशा तीन महिन्यात जवळपास ६७५ रुग्णांचे मोफत डायलिसिस करण्यात आले. सरकारी दवाखान्यांमुळे गोरगरीब रुग्णांचा उपचारावरील खर्च वाचला आहे.खासगी दवाखान्यात सरासरी ४ हजाराचा खर्च
एका रुग्णाला आठवड्यातू दोन ते तीन वेळा डायलिसिस करण्याची गरज भासते. खासगी दवाखान्यात एका डायलिसिसचा खर्च हा ३ ते ४ हजाराच्या घरात जातो. म्हणजे आठवड्यात दोन वेळा डायलिसिस करणाऱ्या रुग्णाला महिन्याकाठी किमान २४ हजार रुपये तर आठवड्यात तीन वेळा डायलिसिस करणाऱ्या रुग्णाला महिन्याकाठी किमान ३६ हजार रुपये खर्च येतो. जिल्हा सामान्य रुग्णालयातील सुविधेमुळे सर्वसामान्य रुग्णांचा हा खर्च वाचत आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात सुसज्ज अशा डायलिसिस विभागाची सुविधा उपलब्ध आहे. येथे येथे एकूण १४ डायलिसिस मशीन व तज्ज्ञ डाॅक्टर उपलब्ध आहेत. महिन्याला सरासरी २२५ रुग्णांचे मोफत डायलिसिस करण्यात येते. - डाॅ. अनिल कावरखेजिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम