वाशिम : कठोर परिश्रम, जिद्द व मेहनत आणि त्यावर आधुनिक तंत्रज्ञान. हे सर्व एकत्र केले तर माणूस काहीही करू शकतो. असाच एक प्रयोग रिसोड शहरातील अमरदास नगर येथील २१ वर्षीय साबीर खान बाली खान याने केला आहे. त्याने भंगारातून जुगाड करत इलेक्ट्रॉनिक बाईक बनविली. यासाठी त्याला २५ हजार रुपये खर्च आला असून ४० किमी मायलेज देत असल्याचा साबीरचा दावा आहे.
लहानपणापासून काहीतरी नवीन करण्याची इच्छा असलेल्या साबीरने स्वत:साठी इलेक्ट्रॉनिक बाईक बनवली. जंक वस्तू आणि काही इलेक्ट्रॉनिक वस्तू ऑनलाइन ऑर्डर करून त्याने सायकल बाईक बनवून सर्वांनाच चकित केले. सध्या मजुरीचे काम करणाऱ्या साबीरचे लहानपणापासूनच स्वप्न होते की, मोठे होऊन स्वत:साठी अशी सायकल बाईक बनवावी, जी पेट्रोलशिवाय चालेल. अखेर १५ दिवसांच्या मेहनतीनंतर त्याचे स्वप्न साकार झाले आणि ही सायकल तयार झाली. जी सध्या इलेक्ट्रॉनिक बाईकच्या नावाने रिसोड शहरात चर्चेत आहे.