वाशिम : काेराेना संसर्गाचा प्रकाेप दिवसेंदिवस कमी हाेत असल्याने प्रशासनातर्फे कडक निर्बंधांत शिथिलता दिल्याने बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. या चैतन्याच्या वातावरणात व्यापार पूर्वपदावर येत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये आनंदी आनंद दिसून येत आहे. असे असले तरी व्यापारी वर्ग काेराेना संसर्ग पाहता खबरदारी घेत असून, इतरांनाही नियमांचे पालन करण्याचे आवाहन करताना दिसून येत आहे.
गत दीड ते दाेन महिन्यांपासून लागलेल्या कडक निर्बंधांमुळे लघुव्यावसायिकांसह व्यापारी वर्ग घरी बसून हाेता. यामुळे माेठ्या प्रमाणात नुकसान सहन करण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली हाेती. अशावेळी प्रशासनाला त्यांच्याकडून विनंतीसुद्धा करण्यात आली हाेती. नियम कडक करून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी; परंतु जून महिन्यात काेराेना संसर्ग कमी हाेत असल्याने शिथिलता देण्यात आल्याने व्यवहार पूर्ववत हाेत असल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठेतील उलाढाल व व्यवसायाबाबत माहिती जाणून घेतली असता सद्य:स्थितीत व्यवसायास सुरुवात झाली आहे. बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण कायम राहावे याकरिता व्यापाऱ्यांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच नागरिकांनी सुद्धा काेराेना संसर्ग अद्याप गेला नाही, काेराना नियमांचे पालन करून बाजारपेठेत असेच चैतन्य राहण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन व्यापारी वर्गांतून करण्यात येत आहे.
--------------------
काेराेना संसर्गामुळे सर्वच व्यापार, उद्याेगांवर परिणाम झाला आहे. काेराेना संसर्ग कमी हाेत आहे, आता हा पुन्हा वाढू नये याकरिता सर्वांनी खबरदारी घेऊन व्यवसाय, धंदे वृद्धिंगत हाेत राहावे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. व्यवसायास सुरुवात झाली असून, पूर्वपदावर येत आहेत.
जुगलकिशाेर काेठारी,
जिल्हाध्यक्ष, व्यापारी मंडळ
जवळपास दीड महिन्यापासून उद्याेग बंद झाल्याने व्यापाऱ्यासह लघुव्यावसायिक अडचणीत आले हाेते. आता पुन्हा उद्याेग सुरू झाल्याने सर्वांनी काळजी घेऊन हे बंद हाेणार नाहीत, याची काळजी घेणे आवश्यक आहे.
आनंद चरखा,
युवा व्यापारी मंडळ, जिल्हाध्यक्ष
काेराेना संसर्गामुळे हार्डवेअर व्यवसाय पूर्णपणे बंद हाेता. आताही पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद नसला तरी हळूहळू गती येईल. नागरिकांनी आराेग्याची काळजी घ्यावी व गर्दी न करता खरेदी करावी.
मनिष मंत्री, हार्डवेअर व्यावसायिक
काेराेना संसर्गामुळे हाॅटेल व्यवसाय पार्सल सुविधेवर सुरू हाेता; परंतु नागरिक काेराेना संसर्गामुळे घाबरत असल्याने धंद्यावर परिणाम हाेता. आता सुरळीत हाेत आहे.
सिद्धू लाेणसुणे पाटील,
हाॅटेल व्यावसायिक
कापड व्यवसाय पूर्णपणे काेराेनाने थांबविला हाेता. आता दुकाने सुरू झाली आहेत. ग्राहक दुकानात येत असल्याने आनंदाचे वातावरण आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी.
नंदकिशाेर पाटील,
कापड व्यावसायिक