वाशिम (मंगरुळपीर), दि. 9 - शहरातील पाणी पातळीत वाढ होऊन पाणीसमस्या दूर व्हावी, या उद्देशाने गतवर्षी आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशनच्या पुढाकारासह लोकसहभागातून शहरातील प्राचीन गाव तलावाचे खोलीकरण करण्यात आले. गतवर्षीच्या पावसामुळे काठोकाठ भरलेला हा तलाव उन्हाळ्यात आटला आणि आता यंदा अपु-या पावसामुळे अद्यापही त्यामध्ये किंचितही जलसाठा वाढलेला नाही. शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या गाव तलावाची स्थिती अत्यंत वाईट झाली होती. हा तलाव बुजत चालला होता. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते सचिन कुळकर्णी यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सहकार्याने लोकसहभागातून या तलावाचे खोलीकरण केले. यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आला. त्यानंतर आलेल्या पावसामुळे हा तलाव काठोकाठ भरला आणि गावातील विहिरी व हातपंपांची पातळी वाढल्यामुळे या तलावाच्या खोलीकरणाचा उद्देश सफल झाल्याचे दिसले. त्यानंतर सचिन कुळकणी आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यकर्त्यांनी या तलावाची सुरक्षा आणि सौंदर्यीकरणाची गरज लक्षात घेऊन त्या संदर्भात जिल्हा प्रशासनमार्फत राज्य शासनाकडे प्रस्ताव मांडला. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी या तलावाचे सौंदर्यीकरण आणि सुरक्षेसाठी कुंपण बांधण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला; परंतु त्या निधीतून अद्याप या तलावाचे सौंदर्यीकरण किंवा कुंपणभिंतीचे कामही करण्यात आले नाही. त्यातच यंदा अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे अर्धा पावसाळा उलटला तरी, हा तलाव कोरडा ठाक आहे. आता येत्या काही दिवसांत जोरदार वृष्टी झाली, तरच हा तलाव भरण्याची शक्यता आहे.
पावसातही वाशिममधील प्राचीन गाव तलाव कोरडा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2017 4:34 PM