वाशिम - एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गतचा लाभ बंद होऊ नये ्म्हणून बालकांची आधार नोंदणी केली जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात आधार नोंदणी केंद्रांची कमतरता असल्याने लाभार्थी बालक, मातांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
सन १९७५ पासून एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना ० ते ६ वर्षे वयोगटातील मुलांच्या विकासाकडे लक्ष देण्यासाठी राबविण्यात येते. या योजनेंतर्गत पुरक पोषण आहार, अनौपचारिक शिक्षण, लसीकरण, आरोग्य तपासणी व संदर्भ सेवा पुरविण्यात येतात. या योजनेंतर्गतचा लाभ देताना बोगस लाभार्थी दाखविण्याची शक्यता नाकारता येत नाही. बोगस लाभार्थीला चाप बसविण्याच्या दृष्टिकोनातून १ एप्रिल २०१८ पासून लाभार्थींची आधार नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे. ज्या लाभार्थींची आधार नोंदणी झालेली आहे व ज्यांचे आधार कार्ड या योजनेशी जोडण्यात आले आहे, अशाच लाभार्थींना यापुढे योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे अंगणवाडीतील सर्व बालकांच्या आधार क्रमांकाची माहिती संकलित केली जात आहे तसेच ज्यांनी आधार नोंदणी केली नाही, अशा बालकांची आधार केंद्रात नोंदणी करून आधार क्रमांक सादर करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने केले आहे. आधार नोंदणीअभावी शासनाच्या योजनेपासून लाभार्थी वंचित राहू नये म्हणून आधार नोंदणी प्रक्रियेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. दुसरीकडे जिल्ह्यात केवळ २० च्या आसपास आधार नोंदणी केंद्र असल्याने गैरसोय होत आहे. आधार नोंदणी केंद्राची संख्या वाढवून देण्याची मागणी काँग्रेसचे वाशिम तालुकाध्यक्ष महादेव सोळंके यांनी गुरूवारी केली आहे.