वाशिम - अंगणवाडी केंद्रातील बालकांची आधार नोंदणी आवश्यक करण्यात आली असून, यापुढे सर्व पर्यवेक्षिकांना मोबाइल टॅब देण्यात येणार आहे. या आधारे आधार नोंदणी करण्यात येणार आहे. वाशिम जिल्ह्यातील ० ते ६ वर्षे वयोगटातील एकूण ८८ हजार ६८८ बालकांपैकी ६९ हजार ६२६ बालकांची आधार नोंदणी झाली असून, उर्वरित सर्व बालकांची नोंदणी पर्यवेक्षिकांद्वारे लवकरच करण्यात येणार आहे.अंगणवाडी केंद्रांतर्गत गर्भवती महिला, माता तसेच बालकांना विविध योजनांचा लाभ दिला जातो. योजनेचा लाभ देताना गैरप्रकार होऊ नये, तसेच बोगस लाभार्थींना आळा बसावा, या उद्देशाने प्रत्येकाची आधार नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. बालकांची आधार नोंदणी असेल तरच योजनेचा लाभ मिळणार असल्याने आणि दुसरीकडे आधार नोंदणीसाठी अत्यल्प केंद्र असल्याने लाभार्थींसमोर पेच निर्माण झाला होता. यातून मार्ग काढण्यासाठी अंगणवाडी पर्यवेक्षिकांना मोबाइल टॅब दिला जाणार आहे. या मोबाइल टॅबद्वारे बालकांची आधार नोंदणी करण्याची जबाबदारी पर्यवेक्षिकांवर सोपविण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यातील ० ते ६ वर्षे वयोगटातील एकूण ८८ हजार ६८८ बालकांपैकी ६९ हजार ६२६ बालकांची आधार नोंदणी करण्यात आली असून, उर्वरित बालकांची आधार नोंदणी ३१ जुलैपूर्वी करावी, अशा सूचना वाशिम जिल्हा परिषद प्रशासनाने पर्यवेक्षिकांना दिल्या.
अंगणवाडी केंद्रांमार्फत दिला जाणारा लाभ पात्र बालकांपर्यंत पोहोचावा, तसेच बोगस लाभार्थींना आळा बसावा म्हणून आधार नोंदणी आवश्यक आहे. वाशिम जिल्ह्यात अंगणवाडी पर्यवेक्षिकांना मोबाइल टॅब देऊन आधार नोंदणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.- दीपक कुमार मीणा,मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद वाशिम.