वाशिम: विविध मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे गत महिनाभरापासून काम बंद आंदोलन सुरू आहे. मागण्यांची दखल न घेतल्याने रिसोड तालुक्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनी ९ जानेवारीला रिसोड पंचायत समितीच्या कार्यालयात धडक दिली़. यावेळी आयुक्तांच्या पत्राची होळी त्यांनी केली व विविध मागण्यांसाठी रितसर निवेदन देण्यात आले.
अंगणवाडी सेविकांना गेल्या अनेक वर्षांपासून तुटपुंजा मानधनावर राबविले जात आहे. लसीकरण मोहीम, गरोदर माता, स्तनदा मातांचे लसीकरण, पोषण आहार, गृहभेटी, ६ महिने ते ३ वर्षे वयोगटांतील बालकांना पोषण आहार, ० ते ६ वर्षे वयोगटातील मुलांना पूरक पोषण आहार बरोबर पूर्व प्राथमिक शिक्षण, त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि भौतिक विकासाच्या दृष्टीने हसत-खेळत शिक्षण देणे, ई-आकार प्रशिक्षण, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शनासह विविध सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचविणे, अशी अनेक कामे अंगणवाडी सेविका करत आहेत तरीही त्यांना अल्प मानधन मिळत आहे. त्यामुळे राज्यभरातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे काम बंद आंदोलन सुरू केले आहे. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून रिसोड शहरात अंगणवाडी सेविक, मदतनीसांनी पंचायत समितीवर मोर्चा काढला. यावेळी सरकारने मागण्यांची दखल न घेतल्यास आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. या आंदोलनात अंगणवाडीतील सेविका व मदतनीस यांसह पदाधिकारी यांनी सहभाग घेतला.