एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून सहा वर्षांआतील बालकांना पूर्व प्राथमिकचे धडे देणे, पोषण आहार पुरविणे, बालकांसह स्तनदा माता, मुलींच्या आरोग्याच्या नोंदी घेणे, लसीकरण यासह विविध प्रकारची कामे केली जातात. जिल्ह्यात १०७६ अंगणवाडी केंद्र असून, १०७६ अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. या सर्व अंगणवाड्यांचे काम ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना शासनाकडून मोबाइल देण्यात आले आहे. स्मार्टफोन कसा वापरावा आणि त्याद्वारे दररोजचा अहवाल कसा पाठवावा, याबाबतचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांनाही देण्यात आले. मात्र, ‘सर्व्हर डाॅऊन’मुळे मोबाइलही हॅंग होत असल्याने ऑनलाइनची कामे प्रभावित झाली आहेत. यावर पर्याय म्हणून ऑफलाइन पद्धतीने दैनंदिन कामांच्या नोंदी घेण्यात येत आहेत.
००
मोबाइलवरून करावी लागणारी सरकारी कामे
अंगणवाडी केंद्रामार्फत पुरविण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या दैनंदिन नोंदी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येतात.
बालकांचे वजन, उंचीच्या नोंदी घेतल्यानंतर याबाबतची दैनंदिन माहिती ऑनलाइन पद्धतीने भरण्यात येते.
स्तनदा माता, मुलींच्या आरोग्याची तपासणी अंगणवाडी केंद्रात केली जाते. याबाबतच्या दैनंदिन नोंदी ऑनलाइन पद्धतीने वरिष्ठांना सादर करणे.
अंगणवाडी केंद्रात विविध प्रकारचे लसीकरण झाल्यानंतर, याचा दैनंदिन अहवाल ऑनलाइन पद्धतीने वरिष्ठांना सादर करणे.
शासनाच्या विविध उपक्रमांतर्गत गृहभेटी देण्यात येतात. याबाबतच्या दैनंदिन नोंदी ठेवणे.
अंगणवाडी केंद्राला संबंधित अधिकारी, वरिष्ठांनी भेट दिल्यानंतर या संदर्भातील माहितीची नोंद ठेवणे.
०००
तांत्रिक अडचणी
अंगणवाड्यांचे काम ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना शासनाने मोबाइल दिले. सर्व्हर डाऊनमुळे तांत्रिक अडचणी येत आहेत. दैनंदिन कामकाज प्रभावित होऊ नये म्हणून ऑफलाइन नोंदीही घेण्यात येत आहे.
- संजय जोल्हे
उपमुख्य कार्यकारी अधिकारी
००
सर्व्हर डाऊन
संपूर्ण राज्यभरातील अंगणवाडी केंद्रांच्या नोंदी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत असल्याने ‘सर्व्हर डाऊन’चा प्रकार वाढीस लागला आहे. यामुळे ऑनलाइन नोंदी अपलोड करण्यात तांत्रिक अडचण निर्माण होत असल्याने अंगणवाडी सेविका त्रस्त झाल्याचे दिसून येते.
००००
जिल्ह्यातील अंगणवाडी १०७६
अंगणवाडी सेविका १०७६
मोबाइल वाटप १०७६