वाशिम : राज्य शासनाने अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षांहूून कमी करून ६० वर्षे करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे राज्यातील १३००० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना १ एप्रिलपासून सेवामूक्त करण्यात येणार असून, त्यांच्यावर ऊपासमारीची पाळी येणार आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे पूर्वीप्रमाणे ६५ वर्षे ठेवण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना साकडे घातले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना शासन निर्णयात बदल करण्याची मागणी करावी, अशा आशयाचे निवेदन जिल्ह्यातील तीन आमदारांना अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्यावतीने देण्यात आले आहे.
राज्य शासनाने २३ फेब्रुवारी २०१८ ला निर्णय घेऊन अंगणवाडी कर्मचार्यांची सेवनिवृत्तीची वयोमयार्दा ६० वर्षे करण्याचे ठरविले आहे, तसेच कमी उपस्थितीच्य अंगणवाड्यांचेचे समायोजन करण्याचाही निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या १ एप्रिल रोजी १३ हजार अंगणवाडी सेविकांना सेवामूक्त करण्यात येणार असून, कमी उपस्थितीच्या अंगणवाड्यांचे समायोजन केल्यानंतर ३२ हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. प्रत्यक्षात इतर राज्यांपेक्षा आधीच महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचारी तुटपुंज्या मानधनावर महिला आणि बाल विकास विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवून इमाने इतबारे काम करीत आहेत. सद्यस्थितीत महाराष्ट्रात अंगणवाडी सेविकांना ५००० रुपये, तर मदतनीसांना २५०० रुपये प्रति महिना मानधन मिळत आहे. राज्यातील बहुतांश अंगणवाडी कर्मचाºयांचा संसार अंगणवाडीच्या मानधनावरच आहे. अशात शासनाने त्यांची सेवा वयोमर्यादा ६० वर्षे करण्याचा आणि कमी उपस्थितीच्या अंगणवाड्यांचे समायोजन करण्याचा कठोर निर्णय घेतला आहे. त्यामुळे हजारो अंगणवाडी कर्मचाºयांच्या कुटूंबांवर उपासमारीची पाळी येईल, तसेच इतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भारही वाढणार आहे. या सर्व बाबींचा विचार करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा पूर्वीप्रमाणेच ६५ वर्षे ठेवावी आणि कमी उपस्थितीच्या अंगणवाड्यांचे समायोजन न करता इतर पर्यायांचा विचार करावा, अशी मागणी अंगणवाडी कर्मचाºयांनी केली आहे. त्यांनी या संदर्भात भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक आणि आमदार लखन मलिक यांना निवेदन सादर केले असून, ही समस्या मुख्यमंत्र्यांपुढे ठेवण्याची मागणीही केली आहे.
लखन मलिक यांनी पाठविले मुख्यमंत्र्यांना पत्र
अंगणवाडी सेविकांनी त्यांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा कमी न करता पूर्वीप्रमाणेच ६५ वर्षे ठेवण्याच्या मागणीसह इतर मागण्या मुख्यमंत्र्यांपुढे मांडण्यासाठी वाशिम-मंगरुळपीरचे आमदार लखन मलिक यांना निवेदन सादर केल्यानंतर लखन मलिक यांनी तात्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून अंगणवाडी कर्मचाºयांच्या मागण्यांचा गांभिर्याने विचार करून त्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे. या पत्रासोबत जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या निवेदनाची प्रतही त्यांनी जोडली आहे.