वाशिम : मानोरा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कारखेडा येथील माया बुदले यांच्या घरी झालेल्या चोरी प्रकरणात संशयित म्हणून नाव का टाकले ? असे म्हणत पोलिस पाटील वासुदेव चंद्रभान सोनोने यांच्यावर १ जुलैला सायंकाळच्या सुमारास पेट्रोल टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी दोन इसमांविरुद्ध मानोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
१ जुलैला कारखेडा येथील मायाबाई बुदले यांचे घरी चोरी झाल्याने दुपारी आयपीएस अधिकारी कृतिका, कारंजा उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे यांनी भेट दिली. यावेळी फिंगरप्रिंट चमू व श्वान पथक सुद्धा दाखल झाले होते. पोलिसांनी गावातील काही संशयित नागरिकांना फिंगरप्रिंट देण्यासाठी बोलाविले होते. यातील राहुल विष्णू जाधव हा पोलिस स्टेशनला आला नाही. रमेश बुदले हा पोलिस स्टेशनला आला; परंतु पुणे येथे जायचे म्हणून निघून गेला. पोलिस पाटील वासुदेव सोनोने सायंकाळी आपल्या दुकानात काही नागरिकांना रहिवासी दाखले देत असताना, कामात अडथळा निर्माण करीत चोरीच्या फिर्यादीत आमचे संशयित म्हणून नाव का टाकले म्हणून राहुल जाधव व रमेश बुदले यांनी वाद घातला. दुकानातून ओढत बाहेर आणून अश्लील भाषेत शिवीगाळ करीत अंगावर पेट्रोल टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. डोळ्यात पेट्रोल गेल्यामुळे डोळ्याने दिसत नसल्याने ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वाशिम येथील शासकीय रुग्णालयात रेफर केले आहे, अशी फिर्याद पोलिस पाटील वासुदेव सोनोने यांनी मानोरा पोलिस स्टेशनला दिली. यावरून आरोपी राहुल विष्णू जाधव व रमेश आनंदराव बुदले यांच्याविरुद्ध कलम ३५३, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादंविनुसार गुन्हे दाखल करण्यात आला. आयपीएस अधिकारी कृतिका यांचे मार्गदर्शनात पुढील तपास मानोरा पोलिस अधिक तपास करीत आहेत.