- नंदकिशोर नारे
वाशिम : प्रधानमंत्री आवास योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली महत्वकांक्षी योजना. प्रत्येक गरिबाला हक्काचे घर मिळावे, या उद्देशाने आखणी करण्यात आलेल्या या योजनेत वाशिम येथीलही एका समाजसेवी ‘अनिल’ने गोरगरिबांचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोलाचा हातभार लावला. यामुळे अनेक गोरगरिब कुटुंबे, दिव्यांगांना मदतीचा हात मिळाला. दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांबरोबरच अल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूल बांधकामासाठी शासनाच्या वतीने अनुदान दिले जाते. यासाठी आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता असते. ही कागदपत्रे गोळा करतांना लाभार्थ्याना नाकीनऊ येत असले तरी ते सहज उपलब्धही होतात.परंतु यामधील सर्वात महत्वाचा कागद म्हणजे घरबांधकामाचा नकाशा. हा नकाशा काढायचा झाल्यास लाभार्थ्यांना आर्कीटेक्ट, बिल्डर्स, इंजिनिअर्स यांचा आधार घ्यावा लागतो. यासाठी ६ ते ७ हजार रुपये सुध्दा मोजावे लागतात. लाभार्थी पैशाची जुळवा जुळव करुन यासाठी प्रयत्नही करतात परंतु वाशिम येथील समाजसेवी अनिल केंदळे यांनी चक्क गरिब, दिव्यांगाना हे नकाशे मोफत तयार करुन एक सामाजिक कार्य पार पाडले. वाशिम नगरपरिषेद अंतर्गंत पंतप्रधान आवास योजनेसाठी जवळपास ४७०० अर्ज प्राप्त झालेत. यापैकी ३८२ घरकुलांचे प्रस्ताव मंजुर झालेत यापैकी जवळपास ९० लाभार्थ्यांच्या घरांचे नकाशे अनिल केंदळे यांनी लाभार्थ्यांना मोफत तयार करुन दिलेत. मंजुर लाभार्थ्यांपैकी १० ते १५ नागरिकांना अनुदानाचे धनादेश सुध्दा देण्यात आले आहेत. अनिल केंदळे यांनी ज्या गोरगरिबांना, दिव्यांगांना सहकार्य केले ते आज मोठया अभिमानाने आमचे घर ‘अनिलभाऊं’मुळे झाल्याचे सांगत आहेत. असे असले तरी केंदळे यांनी याबाबत कोणालाही काही न सांगता आपले कर्तव्य पार पाडले आहे. याबाबत कोणी विचारणाही केली तर आपल्या कार्याची कोण्या गोरगरिबांना मदत होत असेल तर याऐवढे पुण्य तरी कोणते असे ते मानतात. त्यांच्या या कार्याचा गौरव होणे गरजेचे आहे.