वाशिम : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन २०१९-२० मध्ये २ एच.पी. क्षमतेच्या विद्युतचलित कडबा कुट्टी यंत्रांचे पशुपालकांना अनुदान तत्वावर वितरण केले जाणार आहे. याकरिता पशुपालकांनी ३१ मार्च २०२० पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकाºयांकडे (विस्तार) सादर करावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. बी. एस. बोरकर यांनी केले.विद्युतचलित कडबा कुट्टी यंत्रासाठी सर्वसाधारण व अनुसूचित जाती, जमातीच्या पशुपालकांना योजनेच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे सरसकट ५० टक्के अनुदान जास्तीत जास्त ८ हजार रुपये मर्यादेपर्यंत दिले जाणार आहे. सदर योजनेचा लाभ घेताना पशुपालकाकडे किमान १० जनावरे उपलब्ध असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यींना विद्युतचलित कडबा कुट्टी यंत्र स्वत: खरेदी केल्यास ८ हजार रुपयेपर्यंतचे अनुदान डीबीटीद्वारे लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल. लाभार्थ्यांनी भरावयाच्या अर्जाचा नमुना संबंधित पशुवैद्यकीय संस्थेच्या संस्था प्रमुखाकडे तसेच सर्व पंचायत समिती कार्यालयातील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याकडे २५ मार्च २०२० पर्यंत कार्यालयीन वेळेत उपलब्ध राहणार आहे. अर्जासोबत जमिनीचा सातबारा, विद्युत देयकाची झेरॉक्स प्रत, कमीत कमी १० जनावरे असल्याबाबत पशुधन विकास अधिकाºयाचे प्रमाणपत्र, शासनाकडून पुरविण्यात आलेल्या कडबा कुट्टी यंत्रामुळे काही शारीरिक दुखापत झाल्यास शासनाकडे कोणताही दावा करणार नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र, कडबा कुट्टी यंत्राच्या किंमतीच्या ५० टक्के रक्कम स्वत: भरण्यास तयार असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र, आदी कागदपत्रे जोडावी लागणार आहेत, असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. बोरकर यांनी सांगितले.
पशुपालकांना मिळणार कडबा कुट्टी यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 6:38 PM