लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम) : कोरोना विषाणू संसर्गामुळे संचारबंदी लागू असून, वाहतुकीचा प्रश्नही बिकट झाला आहे. या पृष्ठभूमीवर भाजीपाला विक्रेते संकटात सापडले असून, मातीमोल भाव मिळत असल्याने हताश होऊन मानोरा तालुक्यातील माहुली येथील शेतकरी चुन्नीलाल उकंडा राठोड यांनी १२ एप्रिल रोजी आपल्या दीड एकर शेतातील कोबीत जनावरे सोडली.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आला आहे. संचारबंदी लागू असून, तालुका प्रशासन व पोलीस प्रशासनातर्फे कठोर अंमलबजावणी केली जात आहे. शेतमालासह भाजीपाला विक्रीवरही काही प्रमाणात बंधने आली असल्याने शेतकºयांच्या भाजीपाल्याला अपेक्षीत भाव मिळत नाही. शेवटी हताश होण्याची वेळ तालुक्यातील अनेक शेतकºयांवर आली आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यामुळे अपेक्षीत बाजारभाव मिळण्याची अपेक्षा उरली नाही असे माहुली येथील शेतकरी चुन्नीलाल उकंडा राठोड यांनी सांगितले. राठोड यांनी आपल्या दीड एकर शेतात पानकोबीची लागवड केली. हजारो रुपये खर्च करून त्याचे संगोपन केले. परंतु कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे मजुराचा खर्चसुध्दा निघत नाही. म्हणुन उभ्या पिकात जनावरे सोडली आहेत, असे राठोड यांनी सांगितले.
भाजीपाल्याला कवडीमोल भाव; उभ्या कोबी पिकात सोडली जनावरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 5:32 PM