वाशिम: जिल्ह्यात ३ एप्रिल २०२० रोजी पहिला कोरोनाबाधित आढळला. आज या घटनेला वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. आता हा पहिला बाधित ठणठणीत असला तरी, बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून, कोरोना बळींची संख्याही २०० च्या घरात पोहोचली असताना नागरिकांत मात्र कोरोना संसर्गाची फारशी भीती उरली नसल्याचे त्यांच्या वर्तणुकीवरून दिसत आहे.मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील एक ५९ वर्षीय व्यक्ती गतवर्षी मार्च महिन्यात दिल्ली येथील एका धार्मिक संमेलनात सहभागी झाला होता. तो गावात परतल्यानंतर दोन आठवड्यांनी त्याची चाचणी करण्यात आली. त्यात ३ एप्रिल रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. त्यानंतर महिनाभर जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित आढळून आला नाही. तथापि, २ मे रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसोलेशन कक्षात दाखल केलेल्या उत्तर प्रदेशातील एका ट्रक क्लिनरचा मृत्यू झाला. त्याचा कोरोना चाचणी अहवाल ३ मे रोजी पॉझिटिव्ह आला. हा जिल्ह्यातील पहिला कोरोना बळी ठरला. दरम्यान, त्यानंतर मंगरुळपीर तालुक्यातील कवठळ येथील एका व्यक्तीचा वर्ध्यात उपचार घेत असताना मृत्यू झाला आणि तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले.
पहिला कोरोना बाधित व्यवसायात मग्न जिल्ह्यात ३ एप्रिल रोजी पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला होता. मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील या व्यक्तीने उपचाराला प्रतिसाद देत कोरोनावर मात केली. या व्यक्तीचा दुधाचा व्यवसाय असून, तो दुग्ध व्यवसायात मग्न असून, कुटुंबासोबत आनंदात वेळ घालत असल्याचे त्याने सांगितले.
जिल्हाभरात १४ कोविड सेंटरऑक्टोबर २०२० पासून कोरोना संसर्ग नियंत्रणात येऊ लागल्याने शहर स्तरावरील ग्रामीण रुग्णालये आणि जिल्हास्तरावरील जिल्हा रुग्णालयासह इतर एक, दोन ठिकाणी कोविड सेंटर सुरू ठेवत इतर बंद करण्यात आले; परंतु आता कोरोना संसर्ग वाढत आहे.