खराब ईटीआय मशीनमुळे माझ्या प्रामाणिकतेवर अप्रामाणिकतेचा ठपका लागणार आहे, असे लिहून ठेवत नांदेड येथील एका वाहकाने माहुर आगारातील बसमध्ये आत्महत्या केली. मशीनमधील तांत्रिक चुकांचा दोष माझ्यावर टाकला जाणार असून, माझ्या आत्महत्येला कुटुंबातील कोणीही दोषी नाही; तर खराब ई-तिकीट मशीन देणारे एसटी प्रशासन दोषी असल्याचे चारपानी पत्र लिहून नांदेड शहरात वास्तव्यास असलेल्या एस. एस. जानकर नामक एस.टी. वाहकाने २६ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास नांदेड जिल्ह्यातीलच माहूर आगारातील एका बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे नादुरुस्त ईटीआय मशीनचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.
..............
०४
जिल्ह्यातील आगार
१५४
एस.टी. बसेस
३३८
वाहकांची संख्या
........................
बॉक्स :
रोज बिघडतात १० मशीन
वाशिम, रिसोड, कारंजा आणि मंगरूळपीर या चार आगारांना २००च्या आसपास मशीन देण्यात आलेल्या आहेत. त्यातील प्रत्येक आगारातील १० मशीन दैनंदिन नादुरुस्त होतात. यामुळे वाहक वैतागले आहेत.
................
बॉक्स :
वर्षभरात शंभरावर तक्रारी
जिल्ह्यातील चारही आगारांतर्गत कार्यरत असलेल्या वाहकांना देण्यात आलेल्या ईटीआय मशीन प्रवासादरम्यान बंद पडण्याचे अनेक प्रकार गेल्या वर्षभरात घडले आहेत. त्या-त्या आगारात यासंबंधीच्या शंभरावर तक्रारी झालेल्या आहेत. असे असले तरी हा प्रकार अद्याप सुरूच आहे.
..............
वाहक म्हणतात...
पूर्वी ‘ट्रे’च्या माध्यमातून प्रवाशांना तिकिटे दिली जायची. ही पद्धत मोडीत काढून काही वर्षांपासून ईटीआय मशीनद्वारे तिकिटे देण्याची पद्धत अंमलात आणण्यात आली. या मशीनने सोय झाली; मात्र मशीन नादुरुस्त झाल्यास नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
- एल. जी. घुगे
........................
ईटीआय मशीन नादुरुस्तीमुळे कधी तिकिटाची प्रिंट न निघणे, प्रवासादरम्यान १० ते १५ मिनिटे मशीन हँग होणे यांसह इतरही स्वरूपातील अडचणी जाणवतात. अशात लाइन चेकिंग पथकाने तपासणी केल्यास तिकिटांमध्ये गोंधळ झाल्याचा ठपका ठेवला जातो.
- व्ही. के. जाधव
............................
एस. टी. कामगार कोट :
वाशिमसह जिल्ह्यातील इतर तीन आगारांना महाराष्ट्र राज्य एस. टी. परिवहन महामंडळाकडून प्रवाशांना तिकिटे देण्याकरिता ईटीआय मशीन देण्यात आलेल्या आहेत. यामुळे निश्चितपणे वाहकांची सोय झाली; परंतु अनेक मशीनमध्ये बिघाड निर्माण होत असून ही अडचण गेल्या काही दिवसांत अधिकच वाढली आहे. यात वाहक दोषी नाहीत. त्यामुळे कारवाई करताना सारासार विचार व्हायला हवा.
- मनीष बत्तुलवार
आगार सचिव, राष्ट्रीय एस. टी. कामगार काँग्रेस (इंटक)
..............
कोट :
वाशिम एस. टी. आगाराला ५५ ईटीआय मशीन मिळालेल्या आहेत. त्यातील दहा मशीन नादुरुस्त असून, अकोला विभागीय कार्यालयाकडे पाठविण्यात आल्या आहेत. उर्वरित ४५ मशीन सध्यातरी सुस्थितीत सुरू आहेत. मशीन नादुरुस्त झाल्याची वाहकांची तक्रार आल्यास त्याची तत्काळ दखल घेतली जाते. एकाही वाहकावर यासंबंधी कारवाई करण्यात आलेली नाही.
- विनोद इलामे
आगार प्रमुख, वाशिम