०००
केनवड येथे अनुदान रखडले !
वाशिम : ग्रामीण भागातील विविध योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलाचे अनुदान केनवड परिसरातील जवळपास ९० लाभार्थ्यांना मिळाले नाही. घरकुलाचे अनुदान तातडीने देण्याची मागणी लाभार्थींनी शुक्रवारी केली.
००
मानोऱ्यातील खड्डे बुजविण्याला खो
वाशिम : मानोरा शहरातील अंतर्गत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने याचा फटका वाहनचालकांना बसत आहे. काही रस्ते खड्डामय झाल्याने चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्याकडे संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
०००
विहिरीची भरपाई देण्याची मागणी
वाशिम : अंचळ येथे शेतातील विहीर खचल्याचा पंचनामा दिल्यानंतरही दिव्यांग शेतकरी बाबूराव वानखेडे यांना भरपाई मिळाली नाही. वारंवार मागणी करूनही अनुदान मिळत नसल्याने लाभार्थीने प्रशासनाप्रती नाराजी व्यक्त केली.
००
रिठद परिसरात उघड्यावर शौचवारी
वाशिम : ग्रामीण भागात शौचालय उभारण्यात आले असले तरी त्याचा नियमित वापर होत नाही. अनेक ठिकाणी आजही नागरिक गावातील रस्त्याच्या दुतर्फा शौचास बसत असल्याचे चित्र रिठद परिसरात दिसून येते.
०००
‘बेटी बचाओ’ अभियान प्रभावित
वाशिम : कोरोनामुळे रिसोड, मालेगाव, वाशिम तालुक्यात ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियान प्रभावित झाले आहे. महिला व बालकल्याण विभागातर्फे यापूर्वी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती केली होती.
००
रोहयोंतर्गतची कामे अपूर्ण
वाशिम : रिसोड तालुक्यात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेंतर्गतची अनेक कामे अर्धवट आहेत. मजुरांना कामे उपलब्ध व्हावीत म्हणून अर्धवट असलेली कामे सुरू करावीत, अशी मागणी मजुरांनी यापूर्वीही केली होती. तथापि, अद्याप अनेक कामे सुरू करण्यात आली नाहीत.
०००
दुकानांत फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
वाशिम : मालेगाव येथील बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. दरम्यान, काही दुकानांमध्ये गर्दी होत असून, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. कोरोनाचे गांभीर्य ओळखून नागरिक व दुकानदारांनी दुकानांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे.
००
रेतीची अव्वाच्या सव्वा दराने विक्री
वाशिम : जिल्ह्यात रेतीघाट लिलाव न झाल्याने जिल्ह्यात रेती उपलब्ध नाही. घर बांधकाम करणाऱ्यांना अव्वाच्या सव्वा दराने रेती विकत घ्यावी लागत आहे. रेतीघाट लिलाव करण्याची मागणी होत आहे.
००
वाशिम बसस्थानकात शुकशुकाट
वाशिम : कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे प्रवासीदेखील सतर्कता बाळगत आहेत. प्रवाशी नसल्याने अनेक बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या असून, वाशिम येथील बसस्थानकात शुकशुकाट निर्माण झाला.
००००
कोरोनाविषयक नियम पाळण्याचे आवाहन
वाशिम : नागरिकांनी कुठलाही धोका न पत्करता शासनाने घालून दिलेले कोरोनाविषयक नियम पाळावे. पोलिसांवर ताण येईल, अशी कृती करू नये, असे आवाहन रिसोड पोलीस प्रशासनाने केले.
००