वाशिम : जिल्ह्यात आणखी १७ जणांचा कोरोना चाचणी अहवाल गुरुवार, १४ जानेवारी रोजी ‘पॉझिटिव्ह’ आला आहे. यामुळे एकूण बाधितांची संख्या ६,८३२वर पोहोचली आहे. दरम्यान, गुरूवारी नऊजणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जानेवारी महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गुरूवारी १७ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम तालुक्यातील अडोळी येथील १, कळंबा महाली येथील १, रिसोड शहरातील एकता नगर येथील १, लोणी फाटा येथील २, उकीरखेड येथील १, पिंप्री सरहद येथील १, मानोरा शहरातील ३, धामणी येथील १, मोहगव्हाण येथील १, कारंजा शहरातील शिक्षक कॉलनी येथील २, हातोटीपुरा येथील १, भडशिवणी येथील १, मांडवा येथील १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. कोरोनाबधितांच्या संपर्कातील संदिग्ध रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ६,८३२वर पोहोचला आहे. गुरूवारी नऊजणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागातर्फे गावोगावी शिबिरे घेऊन संदिग्ध नागरिकांची कोरोना चाचणी करण्यावर भर दिला जात आहे. कोरोनाचा आलेख खाली येत असला, तरी धोका अजून पूर्णपणे संपलेला नसल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना नेहमी मास्क किंवा रुमालाचा वापर करावा, शारीरिक अंतर नियमाचे पालन करावे आणि हात वारंवार धुवावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले आहे.
००००
११८ जणांवर उपचार
जिल्ह्यात आतापर्यंत ६,८३२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी ६,५६१ जणांनी कोरोनावर मात केली असून, सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर आणि खासगी कोविड रुग्णालये, गृह विलगीकरणात मिळून ११८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
००००
गृह विलगीकरणाला पसंती
साैम्य लक्षणे असलेले रुग्ण खासगी किंवा सरकारी काेविड रुग्णालयापेक्षा गृह विलगीकरणाला पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. खासगी व सरकारी कोविड रुग्णालयांमध्ये ४७ जण उपचार घेत आहेत. उर्वरित ७१ रुग्णांनी गृह विलगीकरणाला पसंती दिली आहे.