जिल्ह्यात २२ एप्रिल २०२१ पासून जमावबंदीची सुधारित नियमावली लागू करण्यात आली. या नियमावलीला १५ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व किराणा दुकाने, भाजीपाला व फळ विक्रीची दुकाने, डेअरी, बेकरी, मिठाई, मांसविक्री व अंडी विक्रीची दुकाने, पशुखाद्य विक्री दुकाने, पावसाळ्याच्या हंगामासाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तूंची दुकाने, दूध संकलन व वितरणास दैनंदिन सकाळी ७ ते सकाळी ११ असे चार तास मुभा देण्यात आली आहे; तर कपड्यांच्या दुकानांसह इतर सर्व दुकाने कडेकोट बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. असे असताना वाशिमसह जिल्ह्यातील इतरही ठिकाणी नियमांची सर्रास पायमल्ली करून दुकानांचे शटर उघडझाप करत अत्यावश्यक सेवेत न मोडणारी दुकानेही साहित्य विक्री करीत आहेत. बाहेरून ‘शटर’बंद दिसणाऱ्या अशा दुकानांच्या आतमध्ये ग्राहकांची गर्दी होत असून नियम पायदळी तुडविले जात असल्यासंबंधीचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले. याची दखल घेत यापूर्वी शहरातील दोन दुकांनावर पोलीस प्रशासन व नगर परिषदेच्या पथकाने अचानक धाड टाकली. चौकशी केली असता, दुकानातील कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणीदेखील केली नसल्याचे निदर्शनास आले होते. दोन दुकानांवर कारवाई केल्यानंतरदेखील काही दुकानांनी नियम पायदळी तुडवून दुपारच्या सुमारास अर्धे दुकान सुरू ठेवल्याचे दिसून येते. शुक्रवार, ७ मे रोजी शहरातील शिवाजी चौक येथील सोमाणी रेडिमेड दुकान सुरू असल्याचे आढळून आल्याने नगरपरिषद व पोलीस विभागाने संयुक्तरीत्या कारवाई करीत संबंधित दुकान सील केले तसेच १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. यावेळी नगरपरिषदेचे मनोज इंगळे, पोलीस निरीक्षक धृवास बावनकर यांच्यासह चमूची उपस्थिती होती. नियमाचे उल्लंघन करून कुणीही दुकाने सुरू ठेवू नये, अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असा इशारा नगरपरिषद, पोलीस व महसूल प्रशासनाने दिला.
वाशिममध्ये आणखी एक दुकान सील; १० हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 4:43 AM