वाशिम : आगामी सण-उत्सव, उन्हाळ्या सुट्या यामुळे होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेने अकोला-पूर्णा रेल्वे मार्गावरुन कोयम्बतूर-भगत की कोठी दरम्यान आणखी एक विशेष एक्स्प्रेस सुरु करण्याचा निर्णय दि.६ एप्रिल रोजी घेतला. कोयम्बतूर-भगत की कोठी या स्थानकादरम्यान आता दोन विशेष रेल्वे धावतील.
गाडी क्रमांक ०४८११ भगत की कोठी विशेष एक्स्प्रेस प्रस्थान स्थानकावरुन १८ ते २७ एप्रिल दरम्यान दर गुरुवारी सायंकाळी १९:३० वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी रात्री २३:३० वाजता वाशिम स्थानकावर पोहचून चौथ्या दिवशी कोयम्बतूर येथे सकाळी ९:३० वाजता पोहचेल. या गाडीच्या प्रत्येकी दोन फेऱ्या होणार आहेत. तर परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०४८१२ कोयम्बतूर-भगत की कोठी एक्स्प्रेस २२ एप्रिल ते १ मे दरम्यान दर बुधवारी प्रस्थान स्थानकावरुन मध्यरात्री २:३० निघेल.वाशिम स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी १०:०२ वाजता पोहचून तिसऱ्या दिवशी सकाळी ११:३० वाजता भगत की कोठी येथे पोहचेल. ही विशेष एक्स्प्रेस जालोर, भीलडी, अहमदाबाद, सुरत, जळगाव, भुसावळ, अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड, निजामाबाद, काचीगुडा, गुटी, इरोड या मार्गे धावेल. गाडीला २५ कोच असणार असून त्यामध्ये १२ स्लीपर, २ सेकंड एसी, ४ थर्ड एसी, २ जनरल आणि २ महिला डब्बे असणार आहेत. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये वाशिमगार्गे दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणारी आणखी एक रेल्वे सुरु झाल्याने वाशिमकर प्रवाशांची सोय होणार आहे.