लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा दोन रुग्णांचे कोरोना विषयक अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर मुंबई येथून ३ जून रोजी मंगरुळपीर तालुक्यातील रामगाव येथे परतलेल्या एका ६० वर्षीय महिलेचा कोरोनाविषयक अहवालही पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १५ वर पोहोचली असून, यापैकी दोघांचा मृत्यू तर सहा जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना यापूर्वीच रुग्णालयातून सुटी देण्यात आली. उर्वरीत सहा जणांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या १९ अहवालांपैकी २ व्यक्तींचे कोरोनाविषयक अहवाल 'पॉझिटिव्ह' आले आहेत. यापैकी एक युवती बोराळा हिस्से (ता. वाशिम) येथील असून, ती कोरोना बाधिताच्या नजीकच्या संपर्कातील आहे. तिच्यावर वाशिम येथे आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहेत, तर मुंबई येथून पोहरादेवी (ता. मानोरा) येथे आलेल्या कुटुंबातील एका ८ वर्षीय बालकाचा अहवालही 'पॉझिटिव्ह' आला. त्याच्या वडिलांचा अहवाल रविवारी निगेटिव्ह आला होता, तर आईचा अहवाल प्रतीक्षेत आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोहरादेवी, वसंतनगर सील करून या भागातील ५८०० नागरिकांची तपासणी आरोग्य विभागाने सुरू केली असतानाच मुंबई येथून मंगरुळपीर तालुक्यातल रामगाव येथे ३ जून रोजी परत आलेल्या एका ६० वर्षीय महिलेचा कोरोना विषयक अहवालही मंगळवारी सायंकाळी पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे प्रशासन व आरोग्य विभाग सर्तक झाले आहे. सदर महिलेवर मंगरुळपीर येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत. तिच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची माहिती घेतली जात असून, ८०० लोकसंख्येचे रामगाव कन्टेनमेंट झोन जाहिर करून बुधवारी सील केले जाणार आहे. त्या बालकाच्या संपर्कातील १२ जण आयसोलेशन कक्षातमुंबई येथून मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे परतलेल्या कुटुंबातील एका ८ वर्षीय बालकाचा कोरोना विषयक अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर आरोग्य विभागाने तातडीने त्याच्या हायरिस्क संपर्कातील माहिती घेत १२ जणांना मानोरा येथील कोविड केअर सेंटरमधील आयसोलेशन कक्षात रवाना केले आहे. त्याशिवाय पोहरादेवी, वसंतनगर येथे आरोग्य पथक दाखल झाले असून, या गावातील ५८०० नागरिकांच्या आरोग्याची तपासणी सुरू केली आहे.आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणाला सुरुवात मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे मुंबई येथून मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे कुटूंबासोबत आलेल्या एका ८ वर्षीय बालकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला असतानाच मंगरुळपीर तालुक्यातील रामगाव येथे ३ जून रोजी मुंबई येथून परतलेल्या ६० वर्षीय महिलेचा कोरोनाविषयक अहवालही पॉझिटीव्ह आल्याने या दोन्ही गावांत आरोग्य विभागाने सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यात पोहरादेवी वसंतनगरमधील ५ हजार ८०० पेक्षा अधिक नागरिकांच्या आरोग्याची, तर रामगाव येथील ८०० नागरिकांच्या आरोग्याच्या माहितीचे संकलन करून त्यांची पुढील १४ दिवस तपासणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.