शिखरचंद बागरेचा, लोकमत न्यूज नेटवर्क, वाशिम: अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिर उघडून लेप प्रक्रिया करण्यासाठीचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने २२ फेब्रुवारी २०२३ रोजी दिले होते. या आदेशानुसार ४२ वर्षांनंतर शनिवार, ११ मार्च रोजी श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिराचे सील काढून दरवाजे उघडण्यात आले. पोलिस अधीक्षक बच्चनसिंह यांच्या हस्ते ९८ वर्षीय साकरचंद शाह यांनी मंदिराची चावी स्वीकारली.
शिरपूर जैन येथे ४२ वर्षांपासून बंद असलेल्या अंतरिक्ष पार्श्वनाथांच्या मंदिराचे सील उघडून मूर्तीला लेप करण्याची परवानगी अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने दिली. त्या ऐतिहासिक आदेशानुसार बच्चनसिंह यांनी शिरपूर पोलिस स्टेशनमध्ये शनिवारी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात गैरअपिलार्थी व तत्कालीन मॅनेजिंग ट्रस्टी ९८ वर्षीय साकरचंद प्रेमचंद शाह (अकोला) व वर्तमान मॅनेजिंग ट्रस्टी दिलीप नवलचंद शाह यांच्याकडे मंदिराची चावी सुपूर्द केली. यावेळी तहसीलदार रवी काळे, कारंजाचे उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे व विश्वस्त मंडळ उपस्थित होते.
चावी घेतल्यानंतर पोलिस प्रशासन व सर्व विश्वस्तांनी मंदिरात पोहोचून सील काढत दरवाजे उघडले. मंदिर उघडल्यामुळे मूर्तीची लेप प्रक्रिया पूर्ण करून समाजबांधवांना पुन्हा पूजन दर्शन करता येणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिराचे दरवाजे अखेर उघडले. भगवंताचे मंदिर उघडून पूजन व दर्शनासाठी खुले असावे, ही सर्वांचीच प्रार्थना होती. - पंन्यास प्रवर श्री परमहंस विजयजी महाराज, शिरपूर जैन
तब्बल ४२ वर्षांनंतर मंदिराच्या कुलपाची चावी व मंदिर उघडण्याचे सौभाग्य वयाच्या ९८व्या वर्षी मिळाले. आयुष्याच्या संध्याकाळी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले. - साकरचंद शाह, माजी मॅनेजिंग ट्रस्टी
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"