वाशिम : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी असतानाही या नियमांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्यांवर तद्वतच बंदीतही गुटखापुड्यांची विक्री करणाऱ्यांवर मंगळवार, २४ एप्रिलपासून धडक कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. नियम तोडणाऱ्यांवर ‘कोटपा’ (सिगारेट- तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रतिबंध) कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार असून त्याची अंमलबजावणी वाशिम शहरात सुरू झाल्याचे दिसून येत आहे.येथील जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संबंध हेल्थ फाऊंडेशनच्या वतीने पोलिस कर्मचाऱ्यांना २३ एप्रिल रोजी ‘कोटपा’ कायद्याचे खास प्रशिक्षण देण्यात आले. तसेच २४ एप्रिलपासून या कायद्याची सक्तीने अंमलबजावणी देखील सुरू करण्यात आली. त्यानुसार, पहिल्याच दिवशी पोलिस कर्मचाऱ्यांनी शहरातील मुख्य चौकात असलेल्या पानटपऱ्यांची झाडाझडती घेवून गुटखापुड्या जप्त केल्या. यासह सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांना यापुढे असा प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याची तंबी देण्यात आली.
धूम्रपानामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांची हवी तशी जागृती लोकांमध्ये नाही. धुम्रपानामुळे अनेकांना कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला बळी पडावे लागते. प्रत्येक ३० सेकंदाला तंबाखूसंबधीत कर्करोग रुग्णाचा मृत्यू होत असून त्यापैकी ९० टक्के मृत्यू हे तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होतात. दरवर्षी १ लाख कर्करोग रुग्णांपैकी ५० टक्के रुग्ण मृत्युमुखी पडतात. मात्र, इतर कर्करोगांपेक्षा तंबाखूमुळे होणारे कर्करोग नियंत्रतीत ठेवता येतील. त्यासाठी प्रत्येकाने अशा व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. ‘कोटपा’सारख्या कायद्याची कडक अमंलबजावणी झाल्यास हजारो लोकांचे प्राण वाचतील, अशा विश्वास जळगावचे सुप्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉ. गोविंद मंत्री यांनी व्यक्त केला.