लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम विभागातील विद्युत कामगारांना या ना त्या कारणाहून अन्याय केला जात असून, याविरोधात विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटनेने एल्गार पुकारला आहे. विद्युत मंडळ तसेच विभागीय कार्यालयासमोर निषेध नोंदवून कामगारांवरील अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशारा संघटनेने दिला.ग्राहकांना वीज सेवा देण्याचा प्रयत्न विद्युत क्षेत्रातील कामगारांकडून केला जात आहे. ग्रामीण भागात अनेक अडचणींचा सामना करीत विद्युत कर्मचारी, कामगार हे कर्तव्य बजावत आहेत. मात्र, किरकोळ कारणावरून कामगारांना बडतर्फ करणे, सुविधा न पुरविणे आदी प्रकार घडत असल्याने कामगारांना अन्याय होत असल्याचा आरोप विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटनेने केला. यासंदर्भात विद्युत मंडळ तसेच विभागीय कार्यालयासमोर द्वारसभाही घेण्यात आली.बडतर्फ केलेल्या कामगारांना त्वरीत सेवेत घ्यावे, कामगारांना टी अॅन्ड पी पुरविण्यात यावी, कामगारांवरील वसुली करीता दडपशाहीचे धोरण लादू नये, मान्यूनपूर्व सुधारणा व अन्य व्यवस्थापन करण्यात यावे, वाशिम उपविभागातील कामगारांकडून मीटर रिडींगचे कामे करून घेतले जात आहे, सदर काम थांबविण्यात यावे, कामगारांचे स्थायी आदेश निर्गमित करण्यात यावे, विद्युत पुरवठा व उपकेद्रांची दुरूस्ती करण्यात यावी, कामगारांचे आर्थिक दावे करण्यात यावे, आदी प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याची यावेळी एकमुखी मागणी करण्यात आली. यावेळी विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटनेचे माजी झोन अध्यक्ष पी. जी.राठोड, प्रादेशिक सचिव प्रभाकर लहाने, झोन सहसचिव गणेश गंगावणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कामगारांचे प्रश्नावर कार्यवाही न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी सर्कल अध्यक्ष शेख अनवर, सर्कल सचिव के.एम.क-हाळे, विभागीय अध्यक्ष जी.आर.पोदाडे, विभागीय सचिव प्रकाश ठाकरे आदींसह शेकडो कामगार उपस्थित होते.
कामगार विरोधी धोरण; विद्युत तांत्रिक कामगार एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 5:37 PM