००००
पाझर तलाव खोलीकरणाची मागणी
रिठद : येथील मुर्डेश्वर पाझर तलावाचे खोलीकरण व नूतनीकरण करण्याची मागणी रिसोड पंचायत समितीच्या माजी सदस्य शारदा नारायणराव आरू यांनी १५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित यंत्रणेकडे केली. निवेदनाच्या प्रतिलिपी पालकमंत्री शंभुराज देसाई, खासदार भावना गवळी यांना देण्यात आल्या.
०००००
नागरिकांची आरोग्य तपासणी मोहीम
केनवड : खबरदारीचा उपाय म्हणून सर्दी, ताप, खोकला असलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी केनवड आरोग्यवर्धिनी केंद्रातर्फे करण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने मंगळवारी केले.
०००००००००
संत सेवालाल महाराज जयंती साजरी
जऊळका रेल्वे : बंजारा समाजाचे धर्मगुरू संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त १५ फेब्रुवारी रोजी जऊळका रेल्वेसह परिसरातील गावांमध्ये कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी समाजबांधवांची उपस्थिती होती.
००००००००००००
‘ब्रॉडबॅन्ड’ सेवेत व्यत्यय
मेडशी : भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) च्या ‘ब्रॉडबॅन्ड’ सेवेत वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे. यामुळे मेडशीसह मालेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी कार्यालयीन कामकाजदेखील प्रभावित होत असल्याचे दिसून येते.
०००००
वीजग्राहकांना वारेमाप देयके
किन्हीराजा : कोरोनाकाळात मीटर रीडिंग घेण्यात न आल्याने आणि आता एकदमच वीज देयक आकारण्यात आल्याने किन्हीराजा परिसरातील ग्राहकांना महावितरणकडून वारेमाप देयके आकारण्यात आले. याकडे संबंधित अभियंत्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी ग्राहकांनी मंगळवारी केली.