वाशिम : जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचा आकडा वाढत आहे. गत १७ दिवसांत ४२ जणांना मृत्यूने गाठले असून, अनेक जण मृत्यूशी झुंज देत आहेत. वेळीच उपचार मिळावे, म्हणून कुणीही अंगावर दुखणे काढू नये, वेळीच चाचणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.
जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण ३ एप्रिल रोजी आढळला होता. ऑक्टोबर, २०२० ते जानेवारी, २०२१ या काळात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढउतार दिसून आले. फेब्रुवारी, २०२१ पासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली असून, यामध्ये जनजीवन विस्कळीत होत आहे. मृत्यूसंख्याही वाढत असल्याने आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल महिन्यात जिल्ह्यात कोरोनाबळींची संख्या वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गत १७ दिवसांत एकूण ४२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने प्रशासनही हादरले आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना, त्या तुलनेत आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध होत नसल्याने संभाव्य विदारक परिस्थितीची चाहूल लागत आहे. ६० वर्षांवरील कोरोनाबळींची संख्या अधिक असल्याने, ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे ठरत आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, दमा व अन्य अतिजोखीम गटातील रुग्णांना कोरोना संसर्ग झाला आणि वेळीच निदान झाले नाही, उपचारास विलंब झाला, तर मृत्यूही ओढवतो, अशी परिस्थिती आहे. एप्रिल महिन्यात कोरोनाबळींची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
बॉक्स..
वेळीच निदान करा... सुरक्षित राहा!
जिल्ह्यात कोरोनाबळींची संख्या वाढत असल्याने सर्दी, ताप, खोकला यासह कोरोनासदृश लक्षणे दिसून येताच, तातडीने चाचणी करावी. कोरोना विषाणू संसर्गाचे वेळीच निदान झाले, तर लवकर उपचार मिळू शकतात. अंगावर दुखणे काढले, तर उपचारास विलंब होतो. परिणामी, रुग्णाची प्रकृती गंभीर होऊन एखाद्या वेळी मृत्यूही ओढावू शकतो. त्यामुळे वेळीच निदान व्हावे, म्हणून कोरोना चाचणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.
०००००
शनिवारीही आठ जणांचा मृत्यू
शनिवार, १७ एप्रिल रोजी प्राप्त अहवालानुसार, जिल्ह्यात आणखी आठ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्युसत्र सुरू असल्यामुळे नागरिकांची चिंता अधिकच वाढली आहे.
००००
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अलीकडच्या काळात मृत्यूची संख्याही वाढत असल्याने, प्रत्येकाने कोरोनापासून बचाव म्हणून कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागातर्फे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनीही सहकार्य करून प्रशासनाला सहकार्य करावे.
- डॉ.मधुकर राठोड,
जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम
००००
गत सात दिवसांतील मृत्यू
११ एप्रिल ०४
१२ एप्रिल ०३
१३ एप्रिल ००
१४ एप्रिल ००
१५ एप्रिल ०५
१६ एप्रिल ०५
१७ एप्रिल ०८