शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने महाडीबीटी पोर्टलवर एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली असून, अनुदानावरील बियाण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन खासदार भावना गवळी यांनी केले आहे.
महाडीबीटी पोर्टलवर 'शेतकरी योजना' या सदराखाली शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबी निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीशी निगडीत विविध बाबींकरिता १५ मेपर्यन्त अर्ज करावेत, असे आवाहन खासदार गवळी यांनी पत्रकात केले आहे. शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर 'शेतकरी योजना' या शीर्षकांतर्गत 'बियाणे' या घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आधार नोंदणी कामासाठी शेतकरी आपल्या जवळच्या सामूहिक सेवा केंद्राची मदत घेऊ शकतात, असे गवळी यांनी पत्रकात म्हटले आहे.