यासंदर्भात अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी पेरणीसाठी राखून ठेवलेल्या सोयाबीन बियाण्यांवर शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रक्रिया करून उगवणशक्ती तपासून घ्यावी. प्रती १०० दाण्यांपैकी ७० दाणे चांगल्यापैकी उगवल्यास उगवणशक्ती ७० टक्के असल्याचे गृहीत धरून एकरी ३० किलो बियाणे पेरणीकरिता वापरावे. तसेच ६५ टक्के उगवणक्षमता असल्यास एकरी ३५ किलो बियाणे वापरण्याची गरज आहे. बियाणे उगवणशक्ती तपासण्यासंबंधी कृषी सहायक, कृषिमित्र व प्रगतिशील शेतकऱ्यांकडून प्रात्यक्षिक करून दाखविण्याची मोहीम जिल्हाभरात राबविण्यात येत आहे. त्याचा इतर शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. याबाबत कुठलीही अडचण असल्यास गावातील कृषी सहायकांशी संपर्क साधून चर्चा करावी, असे आवाहन घोलप यांनी केले.
.................
बाॅक्स :
बियाणे, खत घरपोच मिळण्याची सुविधा
खरीप हंगामासाठी लागणारे बियाणे व खत घरपोच उपलब्ध करून देण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्याकरिता कार्यान्वित करण्यात आलेल्या लिंकवर मागणी नोंदविणे आवश्यक आहे. त्यानंतर बियाणे व खते रास्त दरात तथा पसंतीच्या कृषी सेवा केंद्रांमार्फत घरपोच आणून दिली जातील. मागणी करण्यासंबंधी कृषी सहायक, कृषिमित्रांचे मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी काव्यश्री घोलप यांनी केले आहे.