.......................
विवरणपत्र वेळेत सादर करणे बंधनकारक
वाशिम : जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व खासगी क्षेत्रातील आस्थापनांनी १ ऑक्टोबर २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या तिमाही कालावधीचे ई-आर-१ विवरणपत्र ३१ जानेवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी कळविले आहे.
........................
हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव
जऊळका : वातावरणातील बदलामुळे अनेक ठिकाणी हरभरा पिकावर घाटेअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी उपाययोजना म्हणून इमॅमेक्टीन बेन्झोएट किंवा क्लोरँटेनिपोल हे कीटकनाशक वापरावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. (फोटो - १६)
......................
्रनियमित पाणी पुरविण्याची मागणी
वाशिम : शहरातील अल्लडा प्लॉट परिसरातील संभाजी नगर भागात गेल्या अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा अनियमित झाला आहे. यामुळे रहिवासी हैराण झाले असून वापराकरिता सुद्धा पाणी विकत घेऊन गरज भागवावी लागत आहे. नियमित पाणी पुरविण्याची मागणी अविनाश मुळे यांनी नगर परिषदेकडे शुक्रवारी निवेदनाव्दारे केली.
.....................
घोटाळ्यांमुळे थांबली ‘रोहयो’ची कामे
किन्हीराजा : मालेगाव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात आलेल्या विविध कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला. यामुळे कारवाईचे सत्र सुरू असून ‘रोहयो’ची कामे थांबली आहेत.
................
अवैध रेती वाहतुकीवर कारवाईचे आदेश
वाशिम : तालुक्यात एकाही रेतीघाटाचा लिलाव झालेला नाही. असे असताना चोरट्या मार्गाने अवैध रेती वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी कारवाई करावी, असे आदेश जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी गुरुवारी तहसीलदारांना दिले आहेत.
..................
मोहरीचे पीक ठरले लक्षवेधी
रिठद : वाशिम ते रिसोड मार्गावर काही शेतकऱ्यांनी यावर्षी मोहरी पिकाची लागवड केलेली आहे. पोषक वातावरणामुळे हे पीक चांगलेच बहरले असून उगवलेली पिवळी फुले ये-जा करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
......................
पल्स पोलिओ मोहीम पुढे ढकलली
वाशिम : ठरल्यानुसार दरवर्षी १७ जानेवारीपासून पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येते. यंदा मात्र १६ जानेवारीपासून कोरोना विषाणू लसीकरण मोहीम सुरू झाल्याने पल्स पोलिओ मोहीम पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
....................
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडू सज्ज
वाशिम : जिल्हा अॅथ्लेटिक्स संघटनेकडून घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या खेळाडूंची मुंबई येथे २० जानेवारीला होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्या अनुषंगाने सदर खेळाडू स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत.
..................
वाहन परवाना मिळण्यास विलंब
वाशिम : कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे वाहन परवाना मिळण्यास अर्ज केलेल्या अनेकांना चार ते पाच महिन्यांपासून परवाना मिळालेलाच नाही. हा प्रश्न आता मार्गी लागला असून लवकरच परवाने मिळतील, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून प्राप्त झाली.
.....................
ग्रामीण प्रवाशांना कोरोनाचा विसर
वाशिम : शहरातील पुसद नाका, हिंगोली नाका, रिसोड नाका येथून विविध ठिकाणी अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. ही वाहने खचाखच भरून जात असून ग्रामीण प्रवाशांनाही कोरोनाचा विसर पडल्यागत स्थिती निर्माण झाली आहे.