वाशिम : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडून जिल्ह्यातील नोकरी इच्छुक स्त्री-पुरुष उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दिनांक १० एप्रिल ते १७ एप्रिलदरम्यान वेबपोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी वाशिम जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील खासगी क्षेत्रातील नियोक्ता, आस्थापना प्रमुख यांनी त्यांच्या आस्थापनांवर आवश्यक असणारे मनुष्यबळ पूर्तीकरिता मागणीपत्र ७ एप्रिलपूर्वी सादर करावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.
या मागणी पत्रात पदाचे नाव व पदसंख्या, शैक्षणिक अथवा तांत्रिक पात्रता, वयोमर्यादा व मानधन इत्यादी बाबींचा अंतर्भाव असावा. ज्या खासगी आस्थापनांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावयाचे आहे, त्यांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन बजाज यांनी केले आहे.