००००
केनवड येथे आरोग्यतपासणी
केनवड : केनवड येथे एका जणाचा कोरोना चाचणी अहवाल ७ फेब्रुवारी रोजी पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभागाने संदिग्ध रुग्णांची तपासणी केली. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने रविवारी केले.
००००
ट्रीपल सीट प्रवास; दंडात्मक कारवाई
रिठद : दुचाकीवरून ट्रीपल सीट प्रवास करणा-या जवळपास ६३ जणांवर गत दोन दिवसांत वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशन व जिल्हा वाहतूक शाखेच्या चमूने रिसोड-वाशिम मार्गावरील वांगीफाटा, मोहोजा रोड, रिठद परिसरात दंडात्मक कारवाई केली.
००००
८५० विद्यार्थ्यांना मिळाले गणवेश
अनसिंग : अनसिंग जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषद शाळा व अनुदानित शाळेतील जवळपास ८५० विद्यार्थ्यांना शालेय गणवेश मिळाले आहे. यावर्षी प्रतिविद्यार्थी एकच गणवेश मिळाल्याने पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
०००००
बँक खाते, आधारकार्डची प्रत मागविली
शेलुबाजार : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत परिसरातील काही शेतकऱ्यांचा लाभ त्रुटीच्या पूर्ततेअभावी थांबविण्यात आला आहे. संबंधित लाभार्थ्यांनी खाते क्रमांक, बँक आयएफएससी कोड, आधारक्रमांकाची प्रत सादर करण्याचे आवाहन तहसील प्रशासनाने केले.
०००
फेब्रुवारी महिन्यातील धान्य वितरणात बदल
तोंडगाव : जानेवारी महिन्यापर्यंत रेशन लाभार्थ्यांना गहू व तांदळाचे वितरण करण्यात आले. फेब्रुवारी महिन्यात या वितरणात बदल केला असून, गव्हाचे प्रमाण ५० टक्क्याने कमी करून ज्वारी व मकाचे वितरण केले जाणार आहे.